पर्यटक फुटपाथवर झोपतात? जगाचा ओढा गोव्याकडे; पण शिस्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 07:48 AM2024-01-04T07:48:25+5:302024-01-04T07:49:29+5:30

फुटपाथवर झिंगणारे व झोपणारे पर्यटक हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

goa tourism and tourist worst behavior | पर्यटक फुटपाथवर झोपतात? जगाचा ओढा गोव्याकडे; पण शिस्त नाही

पर्यटक फुटपाथवर झोपतात? जगाचा ओढा गोव्याकडे; पण शिस्त नाही

गोव्याचे निसर्गसौंदर्य जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जगभरातून वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक भेट देतात. मात्र अलीकडे काही देशी पर्यटक गोव्यात शिस्तीत वागत नाहीत. नव्या वर्षी पर्यटकांविषयीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. राजधानी पणजीत फुटपाथवर पर्यटक झोपलेत तर काही पर्यटक चक्क फुटपाथवर पत्त्यांनी खेळतात, अशी दृश्ये सोशल मीडियावरून सगळीकडे पोहोचली. गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला असे काही पर्यटक नख लावत असल्याची गोमंतकीयांची भावना झाली आहे. मोदी सरकारने राजधानी पणजीला स्मार्ट सिटी प्रकल्प दिला, त्या प्रकल्पाचे काम गेली सात वर्षे मरत रखडत सुरू आहे. 

राजधानीतील अनेक रस्ते गेली दोन वर्षे फुटलेले आहेत. एका माजी नगरसेवकाचा तरुण मुलगा स्मार्ट सिटीतील खड्यात पडून चार दिवसांपूर्वीच मरण पावला. संबंधित सरकारी यंत्रणेला याबाबत शाप लागले असतील, पर्यटकही आता राजधानीत फिरू पाहत नाहीत. गोव्याचे सागरकिनारे चांगले पण तथाकथित स्मार्ट सिटीत फिरणे मात्र नको, ही पर्यटकांची भावना आहे. 

मांडवी किनाऱ्यावरील रातराणी, असे वर्णन पणजी शहराचे पूर्वी केले जायचे, एका बाजूने शांत, शीतल मांडवी नदी वाहतेय व त्याच बाजूला नदीला टेकून फुटपाथ आहेत. नदीत कसिनो जुगाराची जहाजे नांगरून ठेवली आहेत. तिथे रोज लाखो पर्यटक असतात. काही पर्यटकांना वेगळीच झिंग चढते. सागरकिनारे, स्वच्छ नद्या आयुष्यात कधीच न पाहिलेले काही पर्यटक तर गोवा पाहून बेभान होतात. असे पर्यटक मग फुटपाथवरही थपकल मारतात, काही जण मद्याच्या आहारी जाऊन फुटपाथचा आधार घेतात, ही वेगळी गोष्ट आहे. मात्र पर्यटन व्यवसायाला अशा प्रकारचे बेशिस्त पर्यटक बदनाम करत आहेत. 

राजस्थान, दिल्ली, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक दर आठवड्याला गोव्यात येतात. शेजारील राज्यातील पर्यटक स्वत:च्या वाहनाने गोव्यात प्रवेश करतात. मोठ्या बसगाड्यांमधूनही पर्यटक येत असतात. मिरामार-दोनापावलच्या पट्ट्यात तसेच कळंगुट- कांदोळी- सिकेरीच्या जगप्रसिद्ध भागात असे काही पर्यटक बस रस्त्याकडेला उभी करून तिथेच स्वयंपाक करताना दिसतात. काही पर्यटक दुपारच्यावेळी शेतात किंवा फुटपाथवर गॅस सिलिंडर ठेवून स्वयंपाक करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे चांगल्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. शिवाय गोव्यात बराच खर्च करणाऱ्या विदेशी पर्यटकांनाही हे चित्र पाहवत नाही. 

युरोपसह अन्य भागांतून जे पर्यटक येतात ते तारांकित हॉटेलांमध्ये राहतात. कधी सकाळी तर कधी सायंकाळी श्रीमंत पर्यटक वॉकसाठी फुटपाथवर, किनाऱ्यांवर येतात. त्यांना देशी पर्यटकांनी अशाप्रकारे फुटपाथ अडवल्याचे चित्र दिसते. मॉर्निंग वॉकसाठीही अडथळा होतो. काही विदेशी पर्यटक अशी दृश्ये कॅमेऱ्यात टिपून व्हायरल करतात, अशी चर्चा हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. गोव्यात जसे धनिक पर्यटक येतात, त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय, गरीब पर्यटकही येतात. प्रत्येकाला परवडतील अशी हॉटेल्स गोव्यात शेकडोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. फक्त डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मात्र हॉटेलचे खोली भाडे वाढलेले असते. नववर्ष साजरे करण्यासाठी येणारे काही पर्यटक अशावेळी बेशिस्त वागतात. 

मिरामार सागरकिनाऱ्यासह बागा-सिकेरी तसेच आश्वे-मोरजी-हरमलच्या पट्ट्यात काही पर्यटक बियर व दारूच्या बाटल्या किनाऱ्यावरच फेकून देतात. काही जण फुटपाथवर बाटल्या फोडतात. याबाबतची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. पर्यटन खात्याने अलीकडे खूप प्रयत्न करून गोव्याच्या पर्यटनाची प्रतिमा सुधारली आहे. गोवा म्हणजे दक्षिणेकडील काशी आहे, असा प्रचार पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि अन्य काही मंत्री करत आहेत. मांडवी किनारी परशुरामाचा भव्य पुतळा अलीकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे साकारला आहे. गोव्यातील काही शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळेही जाणीवपूर्वक उभे करण्यात आले आहेत. डिचोलीसारख्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचाही पुतळा उभा करण्यात आला. वर्षभर राज्यात गोव्याची संस्कृती-कला यांचे दर्शन घडविणारे सोहळे होत असतात. 

लोकोत्सवापासून, पर्पल फेस्त आणि सेरेंडिपीटी फेस्टीवलपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात होत असतो. आता पुढील महिन्यात जगप्रसिद्ध कार्निव्हल उत्सवही होणार आहे यातून जगाला गोव्याच्या पर्यटनाचे मोहक व आकर्षक रूप दिसते. मात्र फुटपाथवर झिंगणारे व झोपणारे पर्यटक हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

 

Web Title: goa tourism and tourist worst behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.