गोव्याला इस्रायली पर्यटकांची बाजारपेठ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 01:50 PM2019-10-17T13:50:18+5:302019-10-17T14:01:13+5:30
इस्रायलमधील तेल अव्हिवहून पर्यटकांना घेऊन आलेले २२० आसनी विमान आज दाबोळी विमानतळावर उतरले.
पणजी - इस्रायलमधील तेल अव्हिवहून पर्यटकांना घेऊन आलेले २२० आसनी विमान आज दाबोळी विमानतळावर उतरले. इस्रायली पर्यटकांच्या बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून गोव्यासाठी ही फार मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
एकीकडे थॉमस कुक ट्रॅव्हल कंपनी बंद पडली असताना ब्रिटिश पर्यटकांच्या संख्येत घट होते की काय असे संकट उभे ठाकले असताना या थेट विमान सेवेने राज्यातील पर्यटक व्यवसायिकांना दिलासा दिलेला आहे. हॉटेलमालक, टॅक्सी ऑपरेटर, ट्रॅव्हलवाले शॅकमालक तसेच अन्य पर्यटन व्यवसायिक या गोष्टीचे स्वागत करत आहेत. इस्रायल आणि भारताला जोडणारे हे थेट विमान आहे आणि भविष्यात मोठ्या संख्येने इस्रायली पर्यटकांची अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी असे ट्वीट केले आहे की, तेल अव्हिव आणि गोव्याला थेट विमान सुरू झाले आहे आणि गोव्याच्या पवित्र भूमीला भेट देण्याची संधी इस्रायली पर्यटकांना आता प्राप्त होणार आहे.
गोव्याचा पर्यटन हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी पर्यटक हंगामात ९८१ चार्टर विमाने आली आणि त्याव्दारे २ लाख ४७ हजार ३६५ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यात रशियन पर्यटकांचा भरणा जास्त होता. इंग्लंड, युक्रेन, कझाकीस्तानमधूनही चार्टर विमाने येतात. पर्यटन मेळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी विदेश दौऱ्यांवर सरकारकडून पैशांची उधळपट्टी केलीजात असल्याचा आरोप सर्रास केला जातो. पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच मंत्र्यांनी अमेरिका, बल्गेरिया, फिनलंड दौरे केले, त्याचे कोणतेही फलित दिसत नाही. कोणताही अनुभव नसलेले साधे कारकून दौऱ्यावर पाठवले जातात. सरकारकडे पर्यटनाचे मार्केटिंग करण्यासाठी योग्य धोरणच नाही, अशी टीका व्यवसायिक करीत आहेत.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रशियात पडत असलेल्या कडक थंडीपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी रशियन पर्यटक हे गरम हवेच्या प्रदेशात येत असतात. त्यामुळे मागची कित्येक वर्षे गोवा हे रशियनांसाठी देखील आवडते पर्यटन क्षेत्र बनले आहे. गोव्यात सरासरी दरवर्षी सात ते आठ लाख विदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यात रशियनांची संख्या सर्वात जास्त असते. त्यांच्या पाठोपाठ ब्रिटीश पर्यटकांचा नंबर लागतो.