गोव्याचा पर्यटन मोसम शुक्रवारी सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:04 PM2019-09-30T13:04:02+5:302019-09-30T13:05:20+5:30
पर्यटन हंगामासाठी गोवा सरकारची जय्यत तयारी
पणजी : गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या शुक्रवारीपासून म्हणजेच 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पर्यटन मोसमाच्या स्वागतासाठी सरकारचे पर्यटन खाते तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळ सज्ज होऊ लागले आहे. यंदाच्या पर्यटन मोसमात रशियन पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढेल, असे सरकारी यंत्रणांना वाटू लागले आहे.
पर्यटन क्षेत्रात गोवा सरकार विविध उपक्रम राबवते. त्याची दखल केंद्रीय पर्यटन मंत्रालयानेही घेतली आहे. साहसी पर्यटन क्षेत्रात गोव्याला नुकताच केंद्र सरकारने पुरस्कार दिला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गोव्याला वर्षाकाठी सरासरी साठ लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. यात बहुतांश देशी पर्यटक असतात. काही लाख परदेशी पर्यटक असतात. गेल्यावर्षी रशियन पर्यटक संख्येने कमी आले होते.
पर्यटन खात्याचे संचालक संजीव गडकर यांना नव्या पर्यटन मोसमाविषयी विचारले असता, ते म्हणाले की यावेळचा पर्यटन मोसम चांगला जाईल. गोव्यात एकूण किती चार्टर्ड विमाने या मोसमात येतील याची आकडेवारी प्राप्त झालेली नाही. पण रशियन पर्यटक यावेळी जास्त संख्येने येतील. येत्या 4 रोजी रशियन पर्यटकांचे पहिले चार्टर्ड विमान येत आहे.
दरम्यान, पर्यटन मोसमाच्या काळात गोव्याचे सागरकिनारे स्वच्छ असायला हवेत असे सरकारचे धोरण आहे. यावेळी बंगळुरूमधील कर्नाटका कमर्शीअल व इंडस्ट्रीयल महामंडळाला गोवा सरकारने किनारपट्टी स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे. तीन वर्षासाठी एकूण पंचवीस कोटी रुपयांना हे कंत्राट दिले गेले आहे. येत्या दि. 1 ऑक्टोबरपासून या कंपनीचे कर्मचारी उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे काम करणार आहे. यापूर्वी दृष्टी यंत्रणेकडून हे काम केले जात होते. पर्यटन खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी लोकमतला सांगितले की, सरकार अॅपही सुरू करेल, जेणेकरून किनाऱ्यांवर कचरा दिसल्यास लोक त्याबाबतचा फोटो पाठवू शकतील व लगेच कंत्राटदार कंपनीच्या माणसांकडून संबंधित किनाऱ्यावर जाऊन तेथील कचरा काढला जाईल.