पर्यटकांच्या सोयीसाठी 50 इलेक्ट्रीक सायकल्स, जीटीडीसीकडून शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:18 PM2018-11-16T19:18:51+5:302018-11-16T19:19:15+5:30
भारतातील हा पहिला इलेक्ट्रीक वाहन पर्यटन उपक्रम आहे व तो बी-लाईव्ह नावाच्या ब्रँण्डखाली चालेल.
पणजी : राज्यात येणाऱ्या देश-विदेशी पर्यटकांना प्रदूषणमुक्त वातावरणात फिरत गोव्याची संस्कृती व निसर्ग पाहता यावा या हेतूने 50 इलेक्ट्रीक सायकल्स गोवापर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) उपलब्ध करणार आहे. त्यासाठीच्या उपक्रमाचा जीटीडीसीकडून शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला.
जीटीडीसीचे अध्यक्ष दयानंद सोपटे व व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. भारतातील हा पहिला इलेक्ट्रीक वाहन पर्यटन उपक्रम आहे व तो बी-लाईव्ह नावाच्या ब्रँण्डखाली चालेल. सध्या पणजी पर्यटन भवनाकडे, जुनेगोवेत आणि दिवाडी येथे इलेक्ट्रीक सायकल्स उपलब्ध असतील. भविष्यात अशा सायकल्सची संख्या पाचशेपर्यंत वाढविली जाईल, असे सोपटे यांनी सांगितले. गोव्याचा निसर्ग व गोव्यातील विविध भाग सायकलद्वारे फिरून पर्यटक पाहू शकतील. त्यांच्यासाठी जे पॅकेज असेल त्यात जेवणासह अन्य खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याची सोय असेल. शिवाय विविध भागांची व वास्तूंची माहिती देणारा एक गाईडही सोबत असेल. बीलाईव्हकडून आर्सिस टुर्स प्रा. लिमिटेडच्या सहभागाने हा उपक्रम राबविला जाईल. जीटीडीसी फक्त समन्वयक म्हणून काम करील. त्यातून थोडा महसूल जीटीडीसीलाही प्राप्त होईल, असे सोपटे व देसाई यांनी सांगितले.
गोव्यात जास्त पर्यटक यायला हवेत म्हणून पर्यटन महामंडळ विविध उपक्रम राबवित राहिल. कारण खाण व पर्यटन ह्या दोनच व्यवसायांवर गोव्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, असे सोपटे म्हणाले. काही प्रयोग यशस्वी होतात तर काही उपक्रम त्रुटी दूर करून नव्याने सुरू करावे लागतात. पर्यटन महामंडळाचे बहुतांश उपक्रम यशस्वी ठरले आहेत. डक बोट सेवा नव्याने सुरू केली जाईल. हेलिकॉप्टर टुरिझमही नव्याने सुरू करण्याचा विचार आहे, असे देसाई यांनी सांगितले.