विकेण्डला गोवा पर्यटकांनी ओव्हर फ्लो, ठिकठिकाणी ट्राफिक जाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 01:51 PM2017-12-25T13:51:24+5:302017-12-25T13:52:11+5:30

नाताळसाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गोवा गाठल्याने वाहनांची गर्दी होऊन ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होते आहे.

Goa tourists get overflow traffic, traffic jams everywhere | विकेण्डला गोवा पर्यटकांनी ओव्हर फ्लो, ठिकठिकाणी ट्राफिक जाम

विकेण्डला गोवा पर्यटकांनी ओव्हर फ्लो, ठिकठिकाणी ट्राफिक जाम

googlenewsNext

पणजी- नाताळसाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गोवा गाठल्याने वाहनांची गर्दी होऊन ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होते आहे. पणजी-मडगाव आणि म्हापसा-पणजी या मार्गावर गेल्या तीन दिवसात अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली. झुवारी आणि मांडवी नदीवर नव्या पुलांचं काम चालू असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. लांबच्या लांब रांगा लागून ठिकठिकाणी वाहनांची कोंडी होत आहेत. कळंगुट, कांदोळी, हणजुण तसेच दक्षिणेतील कोलवा, बेतालभाटी, बाणावली किनारी भागातही कोंडी झाल्याने वाहने अनेक तास खोळंबली.

मांडवी नदीवर तिसरा पूल बांधला जात असल्याने पर्वरी ते पणजी नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो. दुसरीकडे नदीवर समांतर पुलाचे बांधकाम चालू असल्याने जोडरस्ता आणि त्यासाठी लागणाऱ्या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी आगशी ते कुठ्ठाळी बगल मार्गावर ठिकठिकाणी अडथळे निर्माण केलेले आहे. वाहनधारकांना अनेक वळणे घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. पणजीकडून मडगांवकडे जाताना आणि येतानाही या अडथळ्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. 

नाताळ सण आणि त्यात भर म्हणून विकेण्डला सलग मिळालेली सुट्टी त्यामुळे शेजारी राज्यांमधील पर्यटक आपापली वाहने घेऊन मोठ्या संख्येने गोव्यात आलेले आहेत. कार किंवा बाइक भाड्याने घेऊन फिरणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहेत. किनाऱ्यांवर सायंकाळपर्यंत तुडुंब गर्दी होती. गेल्या दोन दिवसात एक लाखाहून अधिक पर्यटक गोव्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन आहे. येत्या २७ ते २९ या कालावधीत वागातोर येथे ‘टाइम आउट सेव्हंटी टू’ हा ईडीएम होणार आहे. या डान्स पार्टीलाही हजारोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावणार असून वाहतुकीचे आणखी तीन-तेरा वाजण्याची शक्यता आहे.
पोलीस यंत्रणा अपयशी

पर्यटकांच्या टोळधाडीसमोर पोलीस यंत्रणांची परीक्षा होते आहे. किनारी भागात अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. कळंगुट, बागामध्ये गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी कोंडी झाली व त्याचा त्रास स्थानिकांना झाला. वाहतुकीच्या नियोजनात पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहे. थर्टी फर्स्टला किनारी भागांमध्ये पार्ट्यांची धूम असणार आहे त्यामुळे या गर्दीत आणखी भर पडणार असून वाहतुकीची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पर्यटकांची संख्या वाढलेली असल्याने आहे, पण त्यांना हाताळण्यासाठी पुरेशी सरकारी यंत्रणा नाही तसेच पायाभूत सुविधाही नाहीत आणि त्याबाबत उदासीनता आहे, हे आता उघड झाले आहे.

कळंगुटला किनाऱ्यावर वाहनांना मज्जाव
कळंगुटमध्ये पर्यटकांची वाहने सेंट आलेक्स चर्चजवळच अडवून तेथे समोरच असलेल्या मोकळ्या जागेत त्यांची पार्किंगची सोय करायची व तेथून किनाऱ्यापर्यंत शटल सेवा द्यायची असा निर्णय रविवारी स्थानिक आमदार तथा उपसभापती मायकल लोबो, पोलिस अधिकारी, सरपंच यांच्या बैठकीत झाला. आजपासून १ जानेवारीपर्यंत पर्यटकांची वाहने सेंट आलेक्स चर्चच्या पुढे नेऊ दिली जायची नाही असा निर्णय झाला आहे. चर्चसमोर मोकळ्या जागेत पर्यटकांनी वाहने ठेवावीत व तेथून शटल बसने कळंगुट, बागा किनाऱ्यापर्यंत जावे. चर्चसमोरच्या मोकळ्या जागेत तशी व्यवस्था करण्यात आली आहे. कळंगुट, बागामध्ये अन्य ठिकाणीही पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

किनारे पर्यटकांनी फुलले
दरम्यान, पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांना विचारले असता ते म्हणाले की, नाताळ-नववर्षाला गोव्यात पर्यटकांची गर्दी यात काहीच नाविन्य नाही. देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. राज्यात हॉटेलांमधील खोल्या फुल्ल आहेत. मोठ्या संख्येने सध्या देशी पर्यटक गोव्यात आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोसमात आतापर्यंत २५0 हून अधिक चार्टर विमाने दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Goa tourists get overflow traffic, traffic jams everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.