गोवा : बेरोजगार युवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयास वेढा, मुलाखतीवेळी प्रचंड गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 12:58 PM2018-01-30T12:58:48+5:302018-01-30T12:59:51+5:30
महसुल खात्यात 40 कारकुन आणि 24 डाटा एन्ट्री ऑपरेटर्स अशी मिळून एकूण 64 पदे भरण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. मुलाखत देण्यासाठी सुमारे एक हजार युवा-युवती आल्या व त्यांनी मोठी रांग केली.
पणजी : महसुल खात्यात 40 कारकुन आणि 24 डाटा एन्ट्री ऑपरेटर्स अशी मिळून एकूण 64 पदे भरण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. मुलाखत देण्यासाठी सुमारे एक हजार युवा-युवती आल्या व त्यांनी मोठी रांग केली. एक प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा घातल्यासारखीच स्थिती निर्माण झाली. मुलाखती दुपारी अडिचच्या सुमारास अचानक बंद केल्या गेल्यानंतर सगळे संतप्त युवक व युवती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दारासमोर जमल्या व गोंधळ निर्माण झाला. प्रथम येईल त्यास प्रथम मुलाखतीसाठी बोलवावे असे ठरले होते. त्यानुसार जो उमेदवार प्रथम आला, त्यास टोकन क्रमांक दिला गेला. आपला नंबर अगोदर लागावा म्हणून प्रत्येक उमेदवाराने पहाटेच पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली होती. हातात विविध प्रमाणपत्रंच्या पिशव्या घेऊन युवा-युवतींनी मुलाखतीसाठी रांग लागली. अगदी उन्हाचीही पर्वा न करता रांगेत बरेच तास युवा-युवती उभ्या राहिल्या. रांग सुमारे दोनशे मीटर लांब होती. जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा घातल्यासारखी रांग पोलिस स्थानकार्पयत पोहचली होती. पाच-पाचजणांना एकदम मुलाखतीसाठी बोलावले गेले. एलडीसी पदासाठी मुलाखती दुपारी अडिच वाजता बंद करण्यात आल्या. ज्यांच्याकडे डाटा एन्ट्री ऑपरेटरसाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता आहे, त्यांनी डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पदासाठी मुलाखत देण्यास पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले. इतरांनी निघून जावे असेही सांगितले गेले. यावेळी ज्यांना मुलाखतीची संधी मिळाली नाही, त्यांनी दारावर गर्दी केली. ती गर्दी आटोक्यात आणताना जिल्हाधिकारी कार्यालयाची बरीच दमछाक झाली. आपण अगोदर आलो असल्याने आपल्याला अगोदर मुलाखतीसाठी बोलविले जावे असेही अनेक उमेदवारांना वाटत होते. एकाचबरोबर अनेकजण मुलाखतीसाठी आत जाण्याचा प्रयत्न करत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी ओळखीच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी अगोदर पाठवतात असाही संशय काही उमेदवारांना आला. यामुळे गोंधळ वाढला. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले.
पालकांच्याही व्यथा..अनेक उमेदवारांसोबत त्यांचे पालकही आले होते. काही पालक वयोवृद्ध होते. त्यांना बिचा:यांना ताटकळत आपल्या मुलांसोबत रहावे लागले. आपल्याला मुलाखतीसाठी बोलावलेच जात नाही किंवा आपल्याला टोकनही मिळत नाही, असा अनुभव येताच काही युवा-युवतींनी माघार घेतली. अनेक पालकही कंटाळून माघारी गेले.
मुलाखतीची प्रक्रिया पारदर्शक आहे. आम्ही मुलाखतीची जाहिरात देताना जे जाहिर केले होते, त्याचनुसार प्रक्रिया पार पाडली गेली आहे. कारकुन पदासाठी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी येत्या 31 रोजी मुलाखत घेतली जाईल. दारावर जर उमेदवार जमले नसते, तर गोंधळ झाला नसता. - निला मोहनन, जिल्हाधिकारी