गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून प्रवेश परीक्षा, पदवी परीक्षेतील गुणवत्ता यादी निष्प्रभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 05:23 PM2018-02-27T17:23:21+5:302018-02-27T17:23:21+5:30
गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेचे गुण हा निकष धरला जाणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत मिळविलेल्या गुणाच्या निकषांवर प्रवेश दिला जाणार आहे.
- वासुदेव पागी
पणजी: गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेचे गुण हा निकष धरला जाणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत मिळविलेल्या गुणाच्या निकषांवर प्रवेश दिला जाणार आहे.
गोवा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत्या वर्षापासून प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पदवी परीक्षेतील गुणवत्ता यादीवर आतापर्यंत प्रवेश दिले जात होते, परंतु ही पद्धत येत्या वर्षापासून बदलण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. १२ वी नंतर सीईटी, एनईईटी सारख्या परीक्षा जशा दिल्या जातात त्याच धर्तीवर परंतु वेगळ््या स्वरूपात या परीक्षा असतील. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर नवीन गुणवत्ता यादी बनविली जाणार आहे आणि त्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिका-याकडून देण्यात आली.
परीक्षेचे नेमके स्वरूप काय असेल याबाबत अद्याप निश्चित असे काही ठरलेले नाही, परंतु पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या अभ्यासक्रमातील विषयांवर ही परीक्षा घेण्याचा निर्णय तूर्त झाला आहे. एकूण गुण आणि इतर स्वरूप नंतर ठरविले जाणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. नवीन प्रवेश पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून होता, परंत यावेळी शैक्षणिक काउन्सीलने हा विषय गांभिर्याने घेतला. त्यासाठी चर्चा करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. नवीन प्रक्रियेसंबंधी अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले नसले तरी निर्णय पक्का झाला असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली.
अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया देशातील अनेक अग्रगण्य विद्यापीठात या पूर्वीच लागू करण्यात आल्या आहेत. ही पद्धती प्रभावीही ठरत असल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या काही पदाधिका-यांचे म्हणणे आहे. मंडळाच्या पुढील बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यतार्ह आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रवेश पद्धत ही सोयीस्कर होईल असाही विद्यापीठाचा दावा आहे.