Goa: मुरगावातून पहिल्यांदाच निघाली वारी, ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ च्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने
By पंकज शेट्ये | Published: July 2, 2024 07:28 PM2024-07-02T19:28:32+5:302024-07-02T19:30:47+5:30
Goa Pandharpur Vari News: ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ च्या गजरात मंगळवारी (दि. २) पहाटे सडा भागातून मुरगाव वारकरी संस्थेची पहिलीच वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. सुमारे १०० वारकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. वारी पालखी, दिंडी, टाळ - मृदंगाच्या गजरात १५ जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहे.
- पंकज शेट्ये
वास्को - ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ च्या गजरात मंगळवारी (दि. २) पहाटे सडा भागातून मुरगाव वारकरी संस्थेची पहिलीच वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. सुमारे १०० वारकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. वारी पालखी, दिंडी, टाळ - मृदंगाच्या गजरात १५ जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी नगरसेविका श्रद्धा आमोणकरही उपस्थित होत्या. मुरगाव मतदारसंघाच्या सडा भागातून पहिल्यांदाच वारी पंढरपूरला निघाली असून हा ऐतिहासिक क्षण पाहण्याची संधी मिळाल्याने आम्ही भाग्यवान असल्याचे ते म्हणाले. वारकरी पंढरपूर गाठण्यासाठी दररोज ३० किलोमीटर अंतर चालणार आहेत. दररोज पहाटे २० किलोमीटर अंतर पार केले जाईल. दुपारी जेवण करून पुन्हा १० किलोमीटरचे अंतर गाठून विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा वारीला सुरुवात होणार आहे. वारीसोबत वैद्यकीय सुविधा, जेवणाची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था असल्याची माहिती देण्यात आली. पंढरपूरला निघालेले वारकरी ४०० किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत.
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर कडूनही शुभेच्छा
सडा येथून निघालेली वारी वास्को येथे पोहोचल्यावर ग्रामदैवत देव दामोदराचे दर्शन घेण्यात आले. तेथे आमदार कृष्णा साळकर, त्यांच्या पत्नी नगरसेविका शमी साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक आणि अनेक भक्तांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तालुक्यातून पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्यासाठी वारीचे आयोजन केल्याने हा एक आनंदाचा क्षण असल्याचे साळकर म्हणाले.