Goa: प्रमोद सावंत सरकारला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २७ पासून विविध उपक्रम
By किशोर कुबल | Published: February 23, 2024 03:43 PM2024-02-23T15:43:21+5:302024-02-23T15:43:31+5:30
Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'पंचायत चलो अभियान, महिला दिन, स्वयंपूर्ण गोवा २.०, पुनरावलोकन तसेच सीएसआर अंतर्गत तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे आधी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
- किशोर कुबल
पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'पंचायत चलो अभियान, महिला दिन, स्वयंपूर्ण गोवा २.०, पुनरावलोकन तसेच सीएसआर अंतर्गत तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे आधी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार परिषदेची माहिती दिली. ते म्हणाले की, '२७ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि १०मार्चपर्यंत चालतील.'
सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे पूर्ण होण्याची वास्तविक तारीख १९ मार्च आहे, तथापि, ही तारीख लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये येण्याची शक्यता असल्याने या उपक्रमांचे आयोजन आगाऊ केले जाणार आहे.
'पंचायत चलो अभियानाचा एक भाग म्हणून १२ मंत्री सर्व बाराही मतदारसंघातील पंचायतींना भेटी देतील. महिला दिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ मार्च रोजी राज्यभरातील सेल्फ हेल्प ग्रुपशी संवाद साधतील. त्या दिवशी बँकेच्या वितरणाव्यतिरिक्त बचत गटांना ४ कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित केला जाईल. गोव्यात सुमारे ११४५ बचत गट आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
४० अर्धवेळ ईएसआय कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करणार
४० ईएसआय कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे कर्मचारी गेला २० वर्षांहून अधिक काळ अर्धवेळ तत्त्वावर काम करत होते, त्यामुळे सरकारने त्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पगार सुमारे १५ हजार रुपयांवरून किमान २५ हजार रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे ते म्हणाले.
वेदांतासोबत पहिला खाण विकास उत्पादन करार
डिचोली खाण ब्लॉकसाठी सरकार वेदांता सोबत पहिला खाण विकास उत्पादन करार आणि खाण लीज डीड मंजुरी दस्तऐवजावर स्वाक्षरी करील. प्रस्तुत ब्लॉकसाठी ई-लिलाव जिंकलेल्या या कंपनीने यापूर्वीच पर्यावरणीय मंजुरी घेतली आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.
दरम्यान, सरकारी वकिलांची दोन नियमित पदे भरली जातील.