भाजपासाठी धोक्याची घंटा; गोव्यातील बड्या नेत्यालाही खुणावतोय 'महाविकास आघाडी'चा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:01 PM2019-11-29T14:01:01+5:302019-11-29T17:15:51+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण अस्तित्वात आल्यानंतर आता शिवसेनेनं गोव्यातही असा प्रयोग होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे.
पणजी- महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण अस्तित्वात आल्यानंतर आता शिवसेनेनं गोव्यातही असा प्रयोग होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे. गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून, विजय सरदेसाईंनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. त्यामुळे गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई संपर्कात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या भेटीनंतर विजय सरदेसाईंनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
फक्त घोषणा करून सरकार बदलत नसतं. ते सगळं अचानकच होतं. महाराष्ट्रात जे झालं तसा प्रयोग गोव्यातही केला पाहिजे. सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही संजय राऊतांची भेट घेतलेली आहे. 'महा विकास आघाडी' तयार झालेली आहे. ती गोव्यापर्यंतही विस्तारायला हवी, असंही ते म्हणाले आहेत.
Vijai Sardesai, Goa Forward Party: Govts don't change after making announcement. It happens suddenly. What happened in Maharashtra, should be done in Goa too. Opposition should come together. We met Sanjay Raut. 'Maha Vikas Aghadi' which has been formed, should extend to Goa too. https://t.co/eKYHS1gAsApic.twitter.com/icYTPg6gy3
— ANI (@ANI) November 29, 2019
गोव्यात विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आमदार आहे. गोवा विधानसभेसाठी 2017मध्ये निवडणूक झाली होती. भाजपा, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं भाजपानं सरकार स्थापन केलं होतं. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक 14 जागा होत्या. तर भाजप आमदार फ्रान्सिस डिसूजा आणि मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने भाजपाकडे आता 12 आमदारांचं बळ आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 1 आणि अपक्ष असे 3 आमदार आहेत, तर 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे. काँग्रेसच्या 12 आमदारांनी वेगळा गट करून भाजपाला साथ दिली. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 27 वर पोहोचलं. त्यामुळे आता गोव्यात कोणता भूकंप घडतो का हे लवकरच समजणार आहे.