गोव्यात किनारपट्टीपेक्षा डोंगर भागात पावसाचा जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 09:21 PM2019-07-27T21:21:18+5:302019-07-27T21:21:42+5:30
केपे, सांगे, सत्तरी या गोव्याच्या पूर्वेकडील तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. किनारपट्टीपासून लांब असलेल्या डिचोली तालुक्यातही जोरदार पाऊस पडला.
- वासुदेव पागी
पणजी: मान्सूनच्या सामान्य प्रमाणापेक्षाही ८ टक्के अधिक सरासरी पाऊस यंदा राज्यात कोसळला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार सांगे, केपे, सत्तरी आणि डिचोलीत सर्वाधिक पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे पाहता किनारपट्टीपेक्षा डोंगरकडे अधिक बरसले आहेत.
पावसाचा जोर किनारपट्टी भागापेक्षा पश्चिम घाटाकडे अधिक दिसत आहे. केपे, सांगे, सत्तरी या गोव्याच्या पूर्वेकडील तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. किनारपट्टीपासून लांब असलेल्या डिचोली तालुक्यातही जोरदार पाऊस पडला. फोंड्यातील पाऊस शनिवारी हवामान खात्याकडे उपलब्ध नव्हता. सर्वाधिक पाऊस सांगेत ८६ इंच एवढा झाला आहे. केपेत ८४ इंच वाळपईत ८५ इंच तर डिचोली तालुक्यातील साखळी केंद्रात ८० इंच पाऊस नोंद झाला आहे. या उलट किनारपट्टीतील भागात काणकोणात ७० इंच, मुरगावात ७६ इंच, दाबोळीत ७८ इंच, पणजीत ७६ इंच आणि पेडणेत ७८ इंच एवढा पाऊस पडला आहे.
आतापर्यंत राज्यात ७८ इंच एवढा सरासरी पाऊस पडला आहे. मान्सूनच्या सामान्य प्रमाणापेक्षा तो ८ टक्के अधिक आहे. जुलै महिन्याच्या २७ तारखेपर्यंत मान्सूनचे सामान्य प्रमाण आहे ७४ इंच. म्हणजेच सामान्य प्रमाणापेक्षा ८ इंच अधिक पाऊस यंदा पडला आहे. मागील दहा वर्षांच्या पावसाच्या प्रमाणाचा अभ्यास करून भारती हवामान खात्याकूडन पावसाचे सामान्य प्रमाण ठरविले जाते.
यंदा जून पैक्षा जुलै जोरदार बरसला. जूनमध्ये मृगधारा फार कोसळल्या नाहीत, परंतु जूनचा उत्तरार्ध जोरदार पावसाचा ठरला. जून महिन्यात ३० इंच एवढा पाऊस पडला. जुलै महिन्यात 48 इंच पाऊस पडला. जुलै महिन्याची सुरूवातही जोरदार पावसाने झाली, पहिल्या तीन आठवड्यातही जोरदार पाऊस पडला आणि अता शेवटचा आठवडाही एखाद्या दिवसाची विश्रांती घेऊन पाऊस झोडपतच असतो.
सर्व २७ दिवस पाऊस
जुलै महिन्यात यंदा धो धो पाऊस पडला. १ जुलै पासून २७ जुलै पर्यंत एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी पाऊस पडला नाही. हवामान खात्याच्या वेबसाईटवरील आलेखानुसार या महिन्यात २४ तासात सर्वात अधिक पाऊस ४.७ इंच एवढा पाऊस ११ जुलै रोजी नोंदला गेला आहे. त्यानंतर २४ जुलै रोजी ४.३ एवढा नोंदला गेला आहे. सर्वात कमी पाऊस १८ जुलै रोजी ५ मिलिमीटर एवढा नोंदला गेला आहे.