गोवा असा नव्हता; सुभाष वेलिंगकरांचे विधान अन् दुखावलेला ख्रिस्ती समाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 11:50 AM2024-10-08T11:50:12+5:302024-10-08T11:50:27+5:30
अर्थात वेलिंगकर यांचा पूर्ण आदर ठेवून अनेक सच्चे गोंयकार त्यांना सांगतील की- सर तुम्ही चुकलात.
जहाल धर्मवाद, विखारी भाषावाद किंवा टोकाचा प्रांतवाद या तिन्हीचे परिणाम समान असतात. आपले दुर्दैव असे की, भाषा क्षेत्रात वावरणाऱ्या काही विचारवंतांना धर्मवाद नको असतो, पण टोकाचा भाषावाद मात्र हवा असतो. मग मराठीला अभिजात दर्जा मिळणेदेखील काहीजणांना खुपू लागते. मराठीला असलेले स्थानदेखील काढायला हवे, असे मग वाटू लागते. अर्थात तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. गोव्यातील गेल्या काही दिवसांतील घटना, द्वेष- मत्सराचे वातावरण, दोन धर्मांमधील तेढ हे सगळे पाहिले की- विवेकबुद्धी शाबूत असलेल्या गोंयकाराला चिंता सतावू लागते. गोवा राज्य असे कधी नव्हते. हे राज्य शांत, सोशिक, विवेकबुद्धी, सामंजस्य, आपुलकी यासाठीच जास्त ओळखले जाते. 'अतिथी देवो भवः' ही आपली संस्कृती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामुळेच गोव्याचा गौरव होतो.
ख्रिस्ती समाजबांधवांसाठी सेंट फ्रान्सिस झेवियर हे सर्वोच्च श्रद्धेचे स्थान आहे. 'गोंयच्या सायबाचे फेस्त' किंवा त्याचा शवदर्शन सोहळा भरतो तेव्हा ख्रिस्तीबांधवांच्या मनात भक्तीचा पूर येतो. अर्थात काही हिंदू बांधवदेखील सेंट झेवियरच्या फेस्तावेळी ख्रिस्ती बांधवांच्या भावनांशी एकरूप होतात, हे आपण पाहिलेले आहे. परवा त्याचसाठी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. आपल्याला एखादा संत हा संत वाटत नसेल तर आपण त्याकडे पाठ फिरवावी, पण दुसरी व्यक्ती जर त्याला संत मानून पूजा करत असेल तर त्या भक्तिभावनेवर आपण हातोडा चालवू शकत नाही.
गोवा मुक्त होऊन साठ वर्षांचा काळ लोटल्यानंतर आपण इतिहासाची मांडणी नव्याने करताना ख्रिस्ती बांधवांना मनाने रक्तबंबाळ करू शकत नाही. इतिहासात निश्चितच चुका झालेल्या आहेत. देशभर विविध राज्यांच्या इतिहासाचे उत्खनन करायला गेलो तर वादासाठी अनेक सांगाडे सापडतील. एकमेकांच्या उरावर बसण्यासाठी उदाहरणे खूप आढळतील. मात्र, त्यातून गोव्याचे भले होणार आहे काय? त्यातून एखादा माथेफिरू मिकी-बिकी तयार होतील. खऱ्या गोंयकारांला तीच चिंता आहे. भाषावादाचा परिणाम म्हणून तिसवाडीतील डोंगरीत एकेदिवशी सहाजणांचे मुडदे पाडले गेले होते, ही घटना आपण विसरू शकतो का? वातावरणात उन्माद भरलेला असतो तेव्हा डोकी चालत नाहीत. विवेकबुद्धी नीट वागत नाही. मग एकमेकांस जखमी करत माणसे आपलाच मुद्दा कसा खरा हे सांगण्याचा ठासून प्रयत्न करतात. समाज दुभंगला जातो.
सेंट झेवियरच्या शवाची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली व ख्रिस्ती बांधव रस्त्यावर आले. केवळ सासष्टीतीलच नव्हे तर ताळगावमधील, फोंड्यातील ख्रिस्ती बांधवही एकवटले. त्यांनी मुठी आवळल्या. वेलिंगकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा विभागाचे माजी संघचालक आहेत. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी केलेले आंदोलन गोमंतकीयांनी कौतुकास्पद मानले होते. अर्थात ते कौतुकास्पद होतेच. कारण प्रथम काँग्रेसशी व मग भाजप सरकारशी टक्कर देऊन वेलिंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन उभे केले होते. ते आंदोलन यशस्वी झाले नाही हा भाग वेगळा पण त्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपचे 'यू-टर्न' उघडे पाडण्यात यश मिळविले. स्व. मनोहर पर्रीकर यांनाही त्याबाबतीत त्यांनी नामोहरम केले होते. वेलिंगकर यांचे मातृभाषा प्रेम बावनकशी सोने आहे. त्याविषयी वाद नाही. 'विद्याभारती'च्या माध्यमातून गोव्यातील मराठी शाळा टिकायला हव्यात म्हणूनही वेलिंगकर यांनी खूप घाम गाळला आहे. खूप कष्ट घेतले आहेत.
मात्र, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी त्यांनी सातत्याने चालविलेली मागणी व केलेली टीका यांचा स्वीकार आजच्या काळात होऊ शकत नाही. होय, सेंट झेवियर पोर्तुगीज काळात गोव्यात धर्म वाढविण्यासाठी आले होते. ख्रिस्ती धर्म वाढविणे हा त्यांचा हेतू होता. मात्र, आपण आज त्या काळात नाही. आपले ख्रिस्ती बांधव हे गोव्यातील हिंदूंचा द्वेष करत नाहीत. ते हिंदूच्या सणात सहभागी होतात व हिंदू बांधवही ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळसह विविध फेस्तांमध्ये सहभागी होतात. हा बंधुभाव वाढवायला हवा. वेलिंगकर आज ७६ वर्षांचे आहेत. अटक चुकविण्यासाठी त्यांना न्यायालयात जावे लागले. काही हिंदूंनी त्यांना हिंदूहृदयसम्राट अशी पदवी दिली. अर्थात वेलिंगकर यांचा पूर्ण आदर ठेवून अनेक सच्चे गोंयकार त्यांना सांगतील की- सर तुम्ही चुकलात.