Goa : मगोपच्या धमकीची भाजपाकडून तूर्त दखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:44 PM2018-11-15T12:44:12+5:302018-11-15T12:44:25+5:30

राज्यातील खनिज खाणी जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत सुरू झाल्या नाहीत तर सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमधून मगो पक्ष बाहेर पडेल, असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिलेला असला तरी, भाजपाने अजून या धमकीची तूर्त गंभीर अशी दखल घेतलेली नाही.

Goa : We will break alliance with BJP, bjp did not respond to MaGoPa threat | Goa : मगोपच्या धमकीची भाजपाकडून तूर्त दखल नाही

Goa : मगोपच्या धमकीची भाजपाकडून तूर्त दखल नाही

Next

पणजी : राज्यातील खनिज खाणी जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत सुरू झाल्या नाहीत तर सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमधून मगो पक्ष बाहेर पडेल, असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिलेला असला तरी, भाजपाने अजून या धमकीची तूर्त गंभीर अशी दखल घेतलेली नाही. महाराष्ट्रात शिवसेना ज्याप्रमाणे सत्तेत राहून भाजपाला धमकावत असते, त्याचप्रमाणे मगो पक्ष गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये राहून भाजपाला धमकावतो व या इशा-यांची मुख्यमंत्री पर्रीकर यांना व गोवा भाजपालाही आता सवयच झाली आहे, अशी चर्चा भाजपाच्या गोटात सुरू आहे.

राज्यातील खनिज खाणींचा विषय पंधरा दिवसांत सुटेल असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी खाण अवलंबितांना सांगितले. मात्र खाण अवलंबितांचा त्यावर विश्वास नाही. केंद्र सरकार गोव्यातील खनिज खाणी सुरू करण्याबाबत गंभीर दिसत नाही. यामुळे सरकारमधून गोवा फॉरवर्ड पक्षाने आणि मगोपने बाहेर पडावे, अशी मागणी खाण अवलंबित करू लागले आहेत. मगोपने येत्या 15 डिसेंबरपर्यंत आपण वाट पाहू व मग सरकारमधून बाहेर पडू अशी भूमिका घेतली आहे. गोवा फॉरवर्डने गोव्याचा खाणप्रश्न केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पोहोचवला. मात्र मगोपने गोव्याहून आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या, अशी मागणी चालवली आहे.

या मागणीची दखल भाजपाने घेऊन पंतप्रधान मोदी यांची आम्ही पुढील आठ दिवसांत अपॉइन्टमेन्ट घेऊ एवढेच मगोपच्या काही नेत्यांना कळविले असल्याची माहिती मिळाली. मात्र 15 डिसेंबरपर्यंत खाणी सुरू झाल्या नाहीत तर मगोप खरोखर सरकारमधून बाहेर पडेल काय याविषयी सत्ताधारी भाजपा साशंक आहे. मगोपा सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे भाजपाच्या कोअर टीमला वाटते व त्यामुळे तूर्त ढवळीकर यांच्या इशा-याची भाजपाने दखल घेतलेली नाही. मात्र मगोसोबत वाद वाढवू नका, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या गाभा समितीच्या काही सदस्यांना यापूर्वी सांगितले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीपर्यंत गोवा सरकार स्थिर राहायला हवे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे धोरण आहे.

Web Title: Goa : We will break alliance with BJP, bjp did not respond to MaGoPa threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.