गोवा वेधणार देशाचे लक्ष, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोमंतभूमी सज्ज: मुख्यमंत्री सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:22 PM2023-10-07T15:22:00+5:302023-10-07T15:23:27+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यात ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष आता गोव्याकडे लागले आहे. या स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे आली असून, आम्ही सज्ज आहोत. ९ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते २६ रोजी मडगाव येथील फातोर्डा मैदानावर सायंकाळी ६:३० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात शुक्रवारी विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे तांत्रिक कमिटीचे प्रमुख अमिताभ शर्मा व क्रीडा सचिव स्वेतिका सचेन उपस्थित होत्या.
आतापर्यंत ३६ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत; परंतु राज्यात होणारी ३७ वी राष्ट्रीय स्पर्धा सर्वांत मोठी स्पर्धा होणार आहे. राज्यात एकूण २८ ठिकाणी ही स्पर्धा होणार असून, सुमारे ४३ क्रीडा प्रकार यात असणार आहेत. देशभरातील एकूण १०,८०६ क्रीडापटू यात सहभागी होणार आहे. यातील ४९ टक्के या महिला खेळाडू असणार आहे, तर सुमारे ४७४० तांत्रिक अधिकारी येणार आहेत. आतापर्यंत ३६ क्रीडा प्रकारापेक्षा जास्त क्रीडा प्रकार कुठल्याच स्पर्धेत झालेले नाहीत. तसेच १० हजार पेक्षा जास्त आणि त्यात ४९ टक्के महिला खेळाडूंचा सहभाग, असेही पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे ही स्पर्धा 'वर्ल्ड रेकॉर्ड' ठरणार आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
१० ठिकाणी लाईव्ह स्क्रीनिंग
मडगाव येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे स्पर्धेचे उदघाटन होणार • आहे. परंतु येथे उपस्थित राहणे सर्वांना शक्य नाही, याचा विचार करता राज्यात १० >विविध ठिकाणी उदघाटनाचे लाईव्ह स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. उदघाटनप्रसंगी लोकांना मोफत प्रवेश असणार आहे, पण गर्दी होणार असल्याने निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान २६ रोजी गोव्यात
राज्यात २६ ऑक्टोबरपासून ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या उदघाटनाचा शानदार सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
स्थानिक आमदारांना उद्घाटनाचा मान
राज्यात जिथे जिथे या स्पर्धा होणार आहेत. तेथे पहिल्या दिवशी स्थानिक आमदारांना या स्पर्धेच्या उदघाटनाचा मान मिळणार आहे. तसेच इतर खेळाडू येथे उपस्थित असणार आहेत. गेली १२ वर्षे लोक या स्पर्धेची वाट पाहत होते, यंदा ही संधी मिळत असल्याने या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन क्रीडामंत्री गावडे यांनी केले.
संधीचे सोने करा : क्रीडामंत्री
आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजक असल्याने प्रत्येक क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा गो खेळाडूंनी फायदा करून घेत गोव्याला पदके मिळवून द्यावीत. तसेच या आपले माध्यमातून आपले कौशल्य विकसित करण्याची चांगली संधी खेळाडूंना आहे. क्रीडा संघटनांची समस्या आम्ही सोडविली आहे. त्यामुळे त्यांना खेळाडूंना प्रशिक्षण देण्यावर जास्त भर द्यावा, असे आवाहन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.