गोवा आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी प्रमुख केंद्र बनवू, ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी PM मोदींची ग्वाही
By किशोर कुबल | Published: October 26, 2023 09:24 PM2023-10-26T21:24:43+5:302023-10-26T21:25:05+5:30
गोव्याने या स्पर्धेसाठी केलेल्या तयारीची मोदींनी वाखाणणी केली.
मडगांव :गोवा आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी प्रमुख केंद्र बनवले जाईल. २०१६ साली येथे ब्रिक्स परिषद भरवली. त्यानंतर हल्लीच जी व्टेंटी बैठका येथे झाल्या व गोव्याच्या नावाने पर्यटन डिक्लेरेशनही झाले. पर्यटनाला रोड मॅप मिळाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की,‘ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे भाग्य गोव्याला लाभले ही फार मोठी उपलब्धी आहे. इफ्फीच्या निमित्ताने गोवा जगभरात पोचला. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळेही गोव्याच्या पर्यटनाला आणखी वाव मिळेल तसेच राज्याचा आर्थिक विकासही होईल. गोव्याने या स्पर्धेसाठी केलेल्या तयारीची मोदींनी वाखाणणी केली.
गोव्याची गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी क्रीडापटू कात्या कुएलो यांनी व राष्ट्रीय ॲथलिट हरमनप्रीत यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची टॉर्च पंतप्रधानांना सुपूर्द केली. मोदींनी गेल्या ३० दिवसात केंद्र सरकारने विविध क्षेत्रात जी विकासकामे केली त्याचा आढावा घेताना क्रीडा क्षेत्रातही भरारी घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले कि,‘ आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शंभराहून अधिक पदके अाणली. वाराणसीत अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचे काम सुरु आहे.
ग्वाल्हेरमध्ये अटलबिहारी वाजपेयी क्रीकेट स्टेडियम सुरु झाले आहे. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत खळाडुंना सहा लाखरुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जात आहे. देशभरात या उपक्रमांतर्गत ३ हजार युवकांचे प्रशिक्षण चालू आहे. केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रात आर्थीक तरतुदीसाठी किंचितही कसुर सोडलेली नाही.’