शाश्वत विकासात गोवा रोल मॉडेल होईल: विश्वजीत राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 10:03 AM2024-07-11T10:03:15+5:302024-07-11T10:03:37+5:30
नगरनियोजन मंडळाची बुधवारी बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शाश्वत विकासाबाबत राज्याला देशातील रोल मॉडल, म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळावे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आयजीबीसी रेटिंग प्रणालीचा अवलंब करून १३ हजार ८४० हून अधिक प्रकल्पांच्या तुलनेत राज्यात ११.८२६ बिलियन चौरस फुट ग्रीन फुटप्रिंटची नोंदणी झाल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
नगरनियोजन मंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. गोवा अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्यावर भर देण्याविषयी चर्चा झाली. या बैठकीला पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, नगरनियोजन खात्याचे मुख्य नियोजक राजेश नाईक व अन्य उपस्थित होते. पर्यावरणाला हानी न पोहचवता शाश्वत विकास यावर भर देण्याच्या दृष्टीने आयजीबीसीचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहे. आयजीबीसी रेटिंग प्रणालीचा अवलंब हे महत्त्वाचे योगदान देणारे आहे.
या प्रभावी उपक्रमात या समृद्ध अनुभवाचा लाभ घेण्यासाठी नगरनियोजन खात्याने आयजीबीसीसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार गोव्यात शाश्वत विकासासाठी अधिक संधी निर्माण करणे, हिरवेगार भविष्य आणि लोकांसाठी चांगल्या इमारतींची खात्री करणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे गोव्याला देशातील हरित आणि शून्य कार्बन निकष पाळून गोव्यातील समृद्ध जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी नगरनियोजन खाते कटिबद्ध असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले.