गोव्याला देशाची दक्षिण काशी बनवणार: पर्यटनमंत्री रोहन खंवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 07:33 AM2024-01-24T07:33:06+5:302024-01-24T07:33:36+5:30
पर्वरीतील 'गोमंतक गातो गीत रामायण'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : रामाचा आदर्श भारतीय जनमानसावर युगाने युगे राहणार आहे. जनतेचे पालन, पोषण, रक्षण करणाऱ्या रामाची शिकवण आपण हृदयात कोरून ठेवली पाहिजे. राम मंदिराची प्रतिष्ठापना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याने राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने या उत्सवात सहभागी व्हायचे ठरविले. समाज माध्यमातून विकृत झालेली गोव्याची प्रतिमा बदलून ती देशाची 'दक्षिणकाशी' अशी बनवणे सरकारसह सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
गोवा माहिती व प्रसिद्ध खाते पुरस्कृत आणि विद्या प्रबोधिनी महाविद्यालय आयोजित 'गोमंत गातो गीत रामायण' या कार्यक्रात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्निल चोडणकर, प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, खजिनदार अवधूत पर्रिकर, सदस्य प्रा. दत्ता भिकाजी नाईक, प्राचार्य डॉ. भूषण भावे, उपप्राचार्य डॉ. अनिल ठोसरे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला हणजूणकर, विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रेषा पेडणेकर, सामंत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीता साळुंखे, माधुरी सिद्धये, कामाक्षी पै उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधन शिक्षण संस्थेच्या शिक्षकवर्गाने सादर केलेल्या सामूहिक रामरक्षा गायनाने झाली. या मंगलसमयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभलेल्या नवभारत घडविण्याच्या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे व रामराज्याची संकल्पना प्रत्यक्ष करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी यावेळी केले. स्वागत प्राध्यापक डॉ. अरुण मराठे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुण मराठे व रुद्रेश म्हामल यांनी केले, तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तप्रसाद जोग, वीरेंद्र आठलेकर, सुनीता फडणीस, काशिनाथ मेस्त्री, नेहा उपाध्ये यांनी केले. कार्यक्रमाला पर्वरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संयोजनाची जबाबदारी अरुण मराठे व रुद्रेश म्हामल यांनी संभाळली.
प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी कारसेवकांनी केलेल्या अतुलनीय शौर्य व त्यागाचे कौतुक केले. यावेळी १९९०-९१ साली बार्देश तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रा. दत्ता भिकाजी नाईक यांनी कारसेवेमागील भूमिका व पार्श्वभूमी विशद केली. राज्यातील गावागावांत गीत रामायण पोहोचविणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनाथ रिंगे यांनी मराठीतून तर सच्चीत पालकर, रंगनाथ पालकर, सुधाकर पालकर, महेश पालकर यांनी लोकपरंपरेनुसार गाहाणे घातले.
'गोमंत गातो गीत रामायण' या कार्यक्रमात २८ गाणी नाट्य व नृत्यासह सादर झाली. किशोर नारायण भावे, शेखर गणेश पणशीकर, डॉ. प्रदीप विठ्ठल सरमोकादम, प्रवीण तुळशीदास नाईक, फ्रान्सिस अँथोनी, डॉ. अरुण रमाकांत मराठे, मान्यता मंदार कुंटे, हर्षा मनोज गणपुले, विकास रामा नाईक, सतीश गोपाळकृष्ण हेगडे, मनोज महादेव गणपुले, विद्याधर रामा नाईक, तारानाथ अण्णाप्पा होळेगडे, सुरेश गंगाराम घाडी, दत्तप्रसाद दत्तात्रय जोग, वीरेंद्र वासुदेव आठलेकर, सुनीता नितीन फडणीस, काशीनाथ रामचंद्र मेस्त्री, नेहा अभय उपाध्ये, मेघना महादेव देवारी यांनी सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी: भूषण भावे
प्राचार्य डॉ. भूषण भावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजनाचा हेतू सांगितला. राम मंदिराच्या संघर्षाची आजच्या पिढीला माहिती मिळावी व त्यातून उद्याच्या उज्ज्वल देशाच्या बांधणीची प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.