गोवा विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 12:37 PM2024-07-03T12:37:29+5:302024-07-03T12:38:45+5:30

प्रेमाताईंचा जन्म गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीतला, त्या काळात सत्तरी तालुक्याचा ग्रामीण भाग सर्वबाबतीत अतिशय मागे होता.

goa will not forget contribution sad demise of prematai purav | गोवा विसरणार नाही

गोवा विसरणार नाही

प्रेमा पुरव यांचे निधन झाल्याची बातमी पुण्याहून गोव्यात बंदुकीच्या गोळीसारखी आली. या गोळीने प्रेमाताईंचे काम ज्यांना ठाऊक आहे, अशा संवेदनशील गोंयकारांच्या मनाचा ठाव घेतला. होय, आजच्या नव्या पिढीतील अनेकांना प्रेमाताईंच्या कार्याची ओळख नसेल. मात्र जुन्या काळातील सर्वांना त्यांचे योगदान ठाऊक आहे आणि गोव्यापेक्षा महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचा जास्त परिचय आहे. पर्ये मतदारसंघात येणारा खोडयें हा अत्यंत निसर्गसुंदर गाव. स्वर्गीय सदानंद उर्फ भाई तेंडुलकर, स्व. शांती तेंडुलकर, सुहासिनी तेंडुलकर आदींमुळे पूर्वी या गावात अनेकजण जायचे, प्रेमाताई पुरव याच गावातल्या आणि याच तेंडुलकर कुटुंबातल्या. लहानपणी त्यांचे घर सुटले. 

प्रेमाताईंचा जन्म गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीतला, त्या काळात सत्तरी तालुक्याचा ग्रामीण भाग सर्वबाबतीत अतिशय मागे होता. मात्र पोर्तुगीजांविरुद्ध लढण्याची जिद्द अनेकांकडे होती. प्रेमाताईंनीही गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला होता. कधी भूमीगत होऊन तर कधी उघडपणे त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत काम केले. गोवा, बेळगाव, मुंबईत राहून काम केले. त्या कम्युनिस्टांच्याही संपर्कात आल्या होत्या. मुंबईतच त्यांचा विवाह झाला आणि जीवनाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. 

प्रेमाताई तेंडुलकर लग्नानंतर पुरव झाल्या. त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी काम केले. प्रेमाताईसारखी अनेक मोठी माणसे महाराष्ट्रात होऊन गेली. त्यापैकी अनेकांचे मूळ गोव्यात आढळते. प्रेमाताईंना पद्मश्री मिळाली होती. सदानंद तेंडुलकर अनेकदा अभिमानाने प्रेमाताईच्या गोष्टी सांगायचे. त्या खूप प्रसिद्ध झाल्यानंतरच्या काळात काहीवेळा गोवा भेटीवर येऊन गेल्या. त्यांच्या मुलाखतींचे कार्यक्रमही झाले. खानावळवाल्या महिलांची संघटना बांधण्याबाबतचे अनुभव वगैरे त्यांनी पूर्वी जाहीरपणे अनेकदा सांगितले आहेत. गोव्यातील अनेक महिलांना प्रेमाताईंविषयी कायम आदर राहिला. कारण त्यांचे अन्नपूर्णा उद्योगाच्या माध्यमातून झालेले कार्य समस्त महिला वर्गाला जास्त आवडले. अगोदर अन्नपूर्णा महिला मंडळ व मग पुढे अन्नपूर्णा उद्योग झाला, प्रेमाताईंच्या जीवनाला खरा आकार हा बेळगाव व मुंबईतच मिळाला. कम्युनिस्टांकडून त्या अनेक गोष्टी शिकल्या. कामगार चळवळींचा अनुभव घेतला. पती कॉम्रेड नरेंद्र पुरव यांच्यासोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही भाग घेतला होता.

प्रेमाताईसारखे महिलांसाठी व्यापक कार्य गोव्यात राहून गोव्यातील कुणी महिला करू शकलेल्या नाहीत. प्रेमाताईंसारखा लढाऊ बाणा गोंयकार महिलांनी दाखवत एखादी मोठी संघटना बांधण्याची गरज आहे. महिला शक्त्ती संघटीत झाली तरच गोव्यातील कसिनो जुगारांसारखे अड्डे रोखता येतील. दारू पिऊन ग्रामीण भागात अनेक गोंयकार मरण पावतात, कमी वयात महिलांच्या वाट्याला हालअपेष्टा येतात. त्यांच्यासाठी काम करू शकेल अशा कुणी प्रेमा पुरव गेल्या पंचवीस वर्षांत तरी गोव्यात झाल्या नाहीत, ही खंत येथे नमूद करावीच लागेल. गोव्यातील अनेक महिला काही राजकीय पक्षांचेच काम करण्यात धन्यता मानतात, भाऊंचा विजय असो आणि भाईचा विजय असो या पलिकडे अलिकडे बऱ्याच महिला जात नाहीत. अर्थात हा विषय वेगळा, पण प्रेमाताई पुरव यांना गोव्याने कधी विसरू नये. गोवा सरकारने पुढाकार घेऊन त्यांचे एखादे स्मारक गोव्यातही उभे करायला हवे. गेली काही वर्षे प्रेमाताई पुण्यात राहायच्या. वय झाल्याने त्या अलिकडे सक्रिय नव्हत्या. पुण्याला आपल्या विवाहित मुलीच्या घरी त्या राहायच्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने विशेषतः महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या घशात हुंदका दाटून आला असेल. 

आज काळ असा आलाय की शेजारच्या घरात पती जर बायकोला मारबडव करत असेल तर कुणी विचारण्यासाठी देखील जात नाहीत, सगळेजण आपापल्या फ्लॅटमध्ये दार बंद करून असतात. टीव्हीवरील क्रिकेटचे सामने पाहण्यात मग्न असतात. प्रेमा पुरव यांच्या सक्रियतेच्या काळात मात्र स्थिती वेगळी होती. त्यांनी पीडित, शोषित महिलांना धीर दिला. आत्मबळ दिले. लढाऊ वृत्ती दिली, नेतृत्व व आवाज दिला, अन्याय सहन करू नका, त्याविरुद्ध संघर्ष करा असे प्रेमाताईंनी गोरगरीब महिलांना सांगितले, त्यांचा सल्ला अनेकींनी ऐकला, २०२२ साली त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा देशातील अनेक महिला खूश झाल्या होत्या. त्यांना अनेक पुरस्कार, अनेकांचे प्रेम व आशीर्वाद मिळाले. तिच त्यांची संपत्ती ठरली. प्रेमाताईंना गोव्याच्यावतीने श्रद्धांजली.

 

Web Title: goa will not forget contribution sad demise of prematai purav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा