गोवा लवकरच स्मार्ट स्टेट बनणार; अभिभाषणात राज्यपालांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2024 09:41 AM2024-02-03T09:41:00+5:302024-02-03T09:41:52+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिभाषणावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकार विविध योजना, उपक्रम राबवून राज्यात शाश्वत विकास उभारण्याचे काम करत आहे. त्यामुळे गोवा 'स्मार्ट सिटी स्टेट' म्हणून विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी साधन सुविधा विकास महामंडळाने गेल्यावर्षी १७३.२० कोटी रुपये खर्चाची १२ कामे पूर्ण केली असून १३ वेगवेगळ्या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल, शुक्रवारी पहिल्याच दिवशी अभिभाषणावेळी ते बोलत होते. लोकांना २४ तास पाणी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील. तसेच ४२.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही येणार आहे. वीज क्षेत्रातही दहा पॅकेजमध्ये कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन सेवा जवानांनी ५५२७ कॉल अटेंड केले व आग दुर्घटनांमधून ८७ मानवी जीव आणि २९ प्राण्यांचे प्राण वाचले. मदतकार्यात एकूण सुमारे १९.४७ कोटींची मालमत्ता वाचविली सरकार स्थानिक भाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पीक खरेदी करून प्रोत्साहन देत आहे. वर्षभरात १०५१.७७ टन स्थानिक भाजीपाला सरकारने खरेदी केला. त्यावर ३ कोटी ८४ लाख २१ हजार रुपये खर्च केले. ८९७ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. तृणधान्य लागवड क्षेत्र २० हेक्टरवरून पन्नास हेक्टरपर्यंत वाढले आहे भात, काजू नारळ यासाठी आधारभूत दर चालू आर्थिक वर्षातच वाढविण्यात आले.
१ लाख ६३ हजार १२३ विद्यार्थी माध्यान्ह आहाराचा लाभ घेत आहेत. त्यावर वर्षाकाठी ३९ कोटी ५३ लाख रुपये खर्च केला जात आहे. गोवा ग्रामीण ऊर्जा योजनेखाली १८३ जणांना घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर दिले.