म्हादई पाणीप्रश्नी गोवाच जिंकेल : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 08:12 PM2019-11-26T20:12:48+5:302019-11-26T20:16:03+5:30
अकारण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.
पणजी : म्हादई पाणीप्रश्नीगोवाच जिंकणार आहे. विजय हा गोव्याचाच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. तसेच त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाला दोष दिला. राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन फॉरवर्डने गोव्याचे नुकसान केले, त्यांचा मुद्दा लवादाने मान्य केला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
म्हादई पाणीप्रश्नी माझा केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की म्हादई पाणीप्रश्नी सर्वानीच थोडे थांबावे. किंचित कळ सोसावी. माझा केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही विश्वास आहे. गोवाच जिंकणार याची मला पूर्ण खात्री आहे. सध्या मी काही बोलत नाही पण गोव्याचा विजय झाल्यानंतर बोलेन. मग मात्र भलत्यांनीच कुणी यशाचे श्रेय घेऊ नये. जे काळे फलक हाती घेऊन रस्त्यावर येतात त्यांनी स्वत: साठी गोवा जिंकला असे समजू नये. अकारण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.
मुख्यमंत्री म्हणाले, की गोवा फॉरवर्ड पक्षाने हरित लवादाकडे धाव घेतल्यानंतर लवादाने दिलेला निवाडा सर्वानीच एकदा वाचून पहावा. फॉरवर्डने लवादाकडे जाऊन गोव्याची हानी केली. हानी कशी झाली ते आपण नंतर सांगेन. तूर्त निवाडा वाचल्यावरही कुणालाही मी काय सांगतोय ते कळेल.
राजकारण करू नका - विजय
दरम्यान, फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी म्हादईप्रश्नी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी गोवा फॉरवर्डची हरित लवादाकडे जाण्याची कृती ही राजकारण करण्याच्या चष्म्यातून पाहू नये. आम्ही लवादाकडे गेल्यानंतरच आम्हाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयास पत्र पाठविण्यासाठी आधार मिळाला. लवादाने आमची याचिका फेटाळली नाही, असे सरदेसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधाने करावीत, कारण हा म्हादई नदीविषयीचा प्रश्न आहे. आम्ही सर्व गोमंतकीयांनी याबाबत एकत्र यायला हवे. जेव्हा आमची याचिका लवादासमोर आली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा वकील किंवा सरकारचा वकील लवादासमोर का उपस्थित राहिला नाही ते सावंत यांनी सांगावे. वकीलाने अनुपस्थित राहून गोव्याचे कोणते कल्याण केले ते सांगावे. आम्ही म्हादईप्रश्नी आमची लढाई सुरूच ठेवू. मुख्यमंत्र्यांना म्हादईचे काही पडलेले नाही, अशा प्रकारचा नेता मुख्यमंत्रीपदी यापुढेही राहणे हे गोव्यासाठी घातक आहे, असे सरदेसाई म्हणाले.