पतीला जीवे मारण्यासाठी पत्नीने दारुत टाकली पाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:27 PM2018-09-29T15:27:27+5:302018-09-29T15:29:28+5:30
अंगावर शहारे आणणाऱ्या कुडचडे (गोवा) येथील बसुराज बारकी याच्या हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येऊ लागली आहे.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - अंगावर शहारे आणणाऱ्या कुडचडे (गोवा) येथील बसुराज बारकी याच्या हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येऊ लागली आहे. आपल्या अनैतिक संबंधात व्यत्यय येत असल्यामुळे त्याची पत्नी कल्पना हिने त्याच्या दारुत पाल टाकून त्याला विषबाधेने मारण्याचा प्रयत्न केला होता.
गोव्यामध्ये ही हत्या 2 एप्रिल 2018 रोजी झाली होती. कल्पना हिने मित्र पंकज पवार, आदित्य गुज्जर, अब्दुल करीम शेख या तिघांच्या सहाय्याने आपल्या पतीची हत्या केली होती. तसेच त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करुन ते जंगलात नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ही हत्या होऊनही तब्बल महिनाभर त्याला वाचा फुटली नव्हती. शेवटी ही होताना कल्पनाच्या खोलीवर असलेली तिची मैत्रीण सिमरन हिने कुडचडे पोलिसांना या हत्येची माहिती दिल्यानंतर वरील चौघांसह पोलिसांनी सुरेशकुमार सोळंकी यालाही अटक केली होती. बसुराजची हत्या करताना त्याचा गळा आवळण्यासाठी वापरलेली नायलॉन दोरी सुरेशकुमारने नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
बसुराज हा म्हापसा येथे एका माणसाकडे वाहन चालक म्हणून कामाला होता. तर त्याची पत्नी कुडचडे येथे एका फ्लॅटमध्ये राहत होती. महिन्यातून एकदा बसुराज आपल्या पत्नीला भेटायला कुडचडेला यायचा. दरम्यानच्या काळात त्याची पत्नी कल्पना हिचे पंकज पवार व इतरांशी संबंध जुळले होते. याच संबंधावरुन पती-पत्नीत वारंवार खटके उडायचे. घरी आलेला असताना बसुराज दारु पिऊन आपल्या पत्नीशी वाद घालायचा. यामुळेच कल्पनाने आपल्या इतर साथीदारांच्या सहाय्याने पतीचा काटा काढण्याचे ठरविले होते.
हत्येच्या आधीच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी कल्पनाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी तिचा पती आपल्या मालकाकडून 50 हजार रुपये घेऊन घरी आला होता. त्या दिवशीही त्याने दारु पिऊन दंगा केला. आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी रात्रीच्यावेळी कल्पनाने त्याच्या दारुत पालीची शेपटी टाकून त्याला विषबाधेने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या या प्रयत्नाला यश आले नाही.कल्पनाने आपल्या या कृत्याची माहिती सुरेशकुमार याला दिली होती.
दुसऱ्या दिवशी बसुराजने पुन्हा एकदा वाद उरकून काढल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कल्पनाने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून आपल्या पतीचा खून केला. त्यानंतर इतर मित्रांना घरी बोलावून विळी, कटर आणि कोयत्याच्या सहाय्याने पतीच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. हे तुकडे केले जात असतानाच सुरेशकुमारचा तिला फोन आला असता, मृतदेहाचे तुकडे करणे चालू आहे असे सांगून कल्पनाने या कृत्याचे फोटो काढून व्हॉटस्अॅपवर सुरेशकुमारला पाठविले होते. त्यानंतर मध्यरात्री गोणपाटात या मृतदेहाचे तुकडे भरुन ते मोले येथील जंगलात फेकून दिले होते. या संबंधीचीही माहिती कल्पनाने सुरेशकुमारला दिली होती.
सध्या याच सुरेशकुमारने आपल्याला माफीचा साक्षीदार म्हणून सवलत द्यावी असा अर्ज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर केला असून या अर्जावर अभियोग पक्षाने आपली बाजू मांडावी असे न्या. सायोनोरा लाड यांनी नमूद करुन या प्रकरणावरील सुनावणी सोमवार 1 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.