गोव्यात कांदा दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसची फलोत्पादन महामंडळावर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 09:23 PM2019-12-06T21:23:26+5:302019-12-06T21:23:33+5:30
महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोंक, करंझाळे येथे फलोत्पादन महामंडळाच्या कार्यालयाच्या मुख्य गेटला टाळे ठोकून जोरदार निदर्शने केली.
पणजी : कांदा दरवाढीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याच्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोंक, करंझाळे येथे फलोत्पादन महामंडळाच्या कार्यालयाच्या मुख्य गेटला टाळे ठोकून जोरदार निदर्शने केली. यानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना घेराव घालण्यात आला. याप्रसंगी महिला पोलिसांबरोबर आंदोलकांची धक्काबुक्कीही झाली.
महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्त्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयावर धडक दिली. काही जणींनी निषेध म्हणून कांद्यांची माळ करून गळ्यात घातली होती. एमडी संदीप फळदेसाई यांना घेराव घातल्यानंतर कुतिन्हो यांनी त्यांना कांदा दरवाढीमुळे गृहिणींची जी फरफट होत आहे त्याबद्दल सांगितले. सरकारने सात दिवसात कांदा सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा गेल्या २९ रोजी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी दिला होता. बाजारात १७0 रुपये किलो दर झालेला असून सरकारने तो स्वस्तात उपलब्ध करावा नपेक्षा महिला काँग्रेस हे काम करील, असे बजावले होते.
कुतिन्हो म्हणाल्या की, देशात कुठेही नव्हे एवढा गोव्यात कांदा महागला आहे. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. संसार कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकार असंवेदनशील बनले असून, जनतेचे कोणतेही सोयरसूतक या सरकारला नाही. कुतिन्हो यांनी यावेळी असाही आरोप केला की, फलोत्पादन महामंडळाच्या दालनांसाठी येणाऱ्या भाज्या हॉटेलांना पुरविल्या जातात लोकांना त्या मिळत नाहीत. देशात अन्यत्र कांदा तुलनेत कमी दराने विकला जात असताना गोव्यातच एवढा महाग का, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, मागे नारळ महागले तेव्हा महिला काँग्रेसने सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून पेडणेपासून काणकोणपर्यंत १0 रुपये नग याप्रमाणे स्वस्तात लोकांना नारळ उपलब्ध केले होते. आंदोलनाच्या वेळी अनुचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात महिला पोलीस तैनात करण्यात आल्या होत्या.