Goa: बऱ्याच वर्षाची तहान लवकरच भागेल, गवळीवाडा येथील नवीन पाण्याची वाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ
By पंकज शेट्ये | Published: October 31, 2023 07:04 PM2023-10-31T19:04:34+5:302023-10-31T19:05:28+5:30
Goa News: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.
- पंकज शेट्ये
वास्को - गवळीवाडा, केळशी भागातील अनियमीत पाणी पुरवठा समस्या दूर करण्यासाठी कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास यांनी पावले उचलल्यानंतर तेथे स्वतंत्र पाणी पुरवठ्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी (दि.३१) शुभारंभ झाला. २० लाख खर्चून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.
कुठ्ठाळी मतदारसंघातील केळशी पंचायतीत असलेल्या गवळीवाडा भागात सुमारे १०० कुटूंबे राहतात. सुमारे ५० वर्षपासून तेथील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा बराच त्रास सोसावा लागतो. तेथील नागरिकांना वेर्णा औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या वाहीनीतून पाणी पुरवठा केला जातो. तेथे राहणाऱ्या नागरिकांना दिवसाला फक्त अर्धातास तर कधी त्याहून कमी वेळासाठी पाणी पुरवठा होत असून काहीवेळा पाणी पुरवठा होत नसल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली. तेथील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यात यावी अशी मागणी तेथे राहणाऱ्या नागरिकांनी आमदार ॲथनी वास यांच्याशी केली होती. गवळीवाडा भागातील पाण्याची समस्या लवकरच दूर करणार असल्याचे आश्वासन वास यांनी काही काळापूर्वी दिल्यानंतर त्यांनी ती समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली होती.
आमदार वास यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या भागात स्वतंत्र पाण्याची भूमीगत वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ केला. सुमारे २० लाख खर्चुन पाण्याची ती वाहीनी घालण्यात येणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
पाण्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वास यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर कुठ्ठाळी जिल्हा पंचायत सदस्या मेरसीयाना वास, केळशी पंचायतीचे सरपंच एफ एक्स फीगरेदो, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर बोलताना ह्या कामाची सुरवात झाल्याने मला अत्यंत आनंद झाल्याचे वास म्हणाले. ५० वर्षाहून अधिक काळापासून गवळीवाडा भागातील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा त्रास सोसावा लागत होता. त्या गावातील नागरिकांनी मला संपर्क करून पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केल्यानंतर त्यासाठी मी त्वरित पावले उचलली. मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांना संपर्क करून गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली होती. त्यांनी तेथील पाण्याची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी नवीन पाण्याची वाहीनी घालण्याबाबत पावले उचलल्याने मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांचा आभारी असल्याचे वास म्हणाले.