गोव्यातील नारळाचे उत्पादन संकटात, आंबा व फणसांच्या झाडांनाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:39 PM2019-03-13T16:39:12+5:302019-03-13T16:47:31+5:30
गोवेकरांच्या अन्नातील मुख्य घटक असलेला नारळ कमी पिकत असताना आता नारळांच्या झाडांना माईट (व्हाईटफ्लाय) या माशीचा फटका बसल्याने गोव्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
मडगाव - गोवेकरांच्या अन्नातील मुख्य घटक असलेला नारळ कमी पिकत असताना आता नारळांच्या झाडांना माईट (व्हाईटफ्लाय) या माशीचा फटका बसल्याने गोव्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. विशेषत: पिलार, ओल्ड गोवा, बेताळभाटी आणि मडगावातील बागायतीत या माईटचा त्रास जाणवू लागला असून त्यामुळे नारळाचे उत्पादन अधिकच कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ओल्ड गोवा येथील भारतीय कृषी अनुसंधानच्या कार्यालयात यासंबंधीच्या तक्रारी आल्या असून विशेषत: किनारपट्टी भागात या माशींचा प्रादुर्भाव अधिक दिसू लागला आहे. याशिवाय हमरस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळांच्या झाडांवरही या माशांचा हल्ला झालेला दिसून येत आहे. कृषी खात्याकडे अद्याप या संबंधीची नेमकी माहिती नसली तरी हा प्रादुर्भाव बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
माईट ही सुमारे दोन मि.मी. आकाराची माशी असून फिकट पिवळ्या रंगाच्या या माशीचे पंख पांढरे असतात त्यामुळे तिला व्हाईटफ्लाय असेही म्हटले जाते. ही माशी नारळाच्या मुळावरच आघात करुन झाडातील पाणी शोषून घेते. त्यामुळे नारळांच्या वाढीवर त्याचा दुष्परिणाम होतो. काही वर्षापूर्वी माईटच्या या हल्ल्यामुळे गोव्यातील नारळाचे उत्पादन निम्म्याने कमी झाले होते. आता पुन्हा एकदा तशी स्थिती निर्माण तर होणार नाही ना अशी भीती व्यक्त केली जाते. ही माशी नारळाप्रमाणेच सुपारी, केळी, पेरु, आंबा आणि फणसांच्या झाडावरही हल्ला करते. त्यामुळे केवळ नारळाचेच पीक नव्हे तर इतर फळांचेही पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोव्यात वाढलेल्या बांधकाम व्यवसाय या माशींचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बांधकाम साईटवरच अशा माशा वाढतात. सुरुवातीला रस्त्याच्या बाजूच्या झाडांवर त्यांचा हल्ला होतो. त्यानंतर हळूहळू ही माशी दुसरीकडेही पसरते अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली.
गोव्यातील आघाडीचे नारळ उत्पादक असलेले सुळकर्णा-केपे येथील प्रवास नाईक यांनी माईटमुळे नारळाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणावर घटल्याचे मान्य केले. ते म्हणाले, सुरुवातीला हा प्रादुर्भाव कर्नाटकातील म्हैसूर आणि काही प्रमाणात केरळातून सुरू झाला होता. या माशींची लागण झाल्यामुळे आम्हाला कित्येक नारळांची झाडेही कापून टाकावी लागली असे त्यांनी सांगितले.
वास्तविक अशा माईट माशींचा लाल मुंग्या नाश करतात. मात्र बागायतदारांकडून रासायनिक फवारणी झाडावर केली जात असल्याने या लाल मुंग्याही कमी झाल्या आहेत त्यामुळेच माईटची माशी फोफावली असल्याचे सांगण्यात आले. या माशीचा नाश करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर फारसा प्रभावी ठरत नसून त्याऐवजी नीम तेलाची फवारणी बागायतदारांनी करावी अशीही सूचना कृषी खात्याकडून करण्यात आली आहे. गोव्यात कित्येककडे या माशींचा नाश करण्यासाठी झाडांना मिरचीचा धुरही दिला जात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.