गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी रमेश होडारकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 03:39 PM2019-01-28T15:39:56+5:302019-01-28T15:42:44+5:30
गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच पुणे गोवन सोशल युनियनचे अध्यक्ष शंकर तथा रमेश होडारकर यांचे 25 जानेवारी रोजी पहाटे 1.30 वाजता पुण्यात निधन झाले.
मडगाव - गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच पुणे गोवन सोशल युनियनचे अध्यक्ष शंकर तथा रमेश होडारकर यांचे 25 जानेवारी रोजी पहाटे 1.30 वाजता पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भाई या नावाने ते परिचित होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते.
होडारकर यांच्यामागे पुत्र उदयन, स्वातंत्र्य सैनिक भगिनी शशिकला आल्मेदा, भाऊ सुरेश असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी स्व. पद्मजा यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. नामवंत साहित्यिक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे ते जावई होते. पं. महादेवशास्त्री यांनी लिहिलेल्या भारतीय संस्कृती कोषाचे होडारकर हे प्रकाशक होते.
होडारकर यांचा जन्म 18 मार्च 1928 या दिवशी कवळे-फोंडा येथे झाला होता. अगदी विद्यार्थी दशेतच त्यांनीच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती. 1946 साली डॉ. राम मनोहर लोहिया यांनी जयहिंदचा नारा दिल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून गोव्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. 23 जून 1946 या दिवशी फोंड्यात झालेल्या अशाच एका मिरवणुकीत होडारकर यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना अटक केली होती. व त्यांना दोन महिन्याची कैद झाली होती. त्यानंतर त्यांनी भूमिगत कार्य सुरू केले होते. 1955 साली याचसाठी त्यांच्यावर आरोप ठेवून दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा फर्मावण्यात आली होती. होडारकर यांनी पुण्यातून आपले गोवा मुक्तीचे कार्य सुरू ठेवले होते. 1949 - 1951 या कालावधीत ते नॅशनल काँग्रेस गोवा संघटनेच्या पुणे शाखेचे चिटणीस म्हणून काम करायचे.
पुण्यातील पुणे गोवन सोशल युनियनचे ते अध्यक्ष होते. पुण्यात शिक्षण, नोकरी तसेच इतर कामासाठी जाणाऱ्या गोवेकरांना निवास व्यवस्था व इतर मदत करण्यासाठी वावरत होते. त्यांच्या परिश्रमामुळे पुण्यात गोवेकरांचीही संघटना तयार होऊ शकली होती. भाईंच्या निधनाने गोवा एका ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाला मुकला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान होते अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. आपण मुख्यमंत्री असताना पुणे गोवन सोशल युनियनतर्फे पुण्यात साजरा केला जाणाऱ्या गोवा क्रांतीदिन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो असे ते म्हणाले. गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग कुंकळयेकर, सचिव वामन प्रभूगावकर तसेच खजिनदार औदुंबर शिंक्रे यांनी होडारकर यांनी आदरांजली वाहिली.
वैष्णवी क्रिएशन्सतर्फे गोव्याच्या बाल व युवा कलाकारांना घेऊन पुण्यात सलग सहा वर्षे क्रांतीदिनानिमित्त टिळक स्मारक सभागृहात संगीत रजनीचे कार्यक्रम सादर केले जायचे. या कार्यक्रमाला गोमंतकीयांनी हजेरी द्यावी यासाठी होडारकर स्वत: पुण्यातील प्रत्येक गोमंतकीयांच्या घरी जाऊन निमंत्रण देत. या कार्यक्रमाच्या आयोजनातही त्यांचा मोलाचा वाटा असायचा असे वैष्णवी क्रिएशन्सच्या स्मीता पै काकोडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे गोवन सोशल युनियननेही होडारकर यांना श्रद्धांजली वाहताना भाईच्या जाण्याने संस्थेचा आधारस्तंभ गेला असे म्हटले आहे.