गोमंतकीय जीवरक्षक मुंबईतील कोळी बांधवाना देणार प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 07:39 PM2018-12-05T19:39:13+5:302018-12-05T19:39:35+5:30
गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षक म्हणून काम करणारे गोमंतकीय लाइफगार्ड आता मुंबईत प्रशिक्षक व इन्ट्रक्टर म्हणून कोळी बांधवांना प्रशिक्षण देणार आहे.
पणजी : गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षक म्हणून काम करणारे गोमंतकीय लाइफगार्ड आता मुंबईत प्रशिक्षक व इन्ट्रक्टर म्हणून कोळी बांधवांना प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दृष्टी लाइफ सेविंग कंपनीतर्फे मुंबईतील गिरगांव चौपाटी, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा व गोराई आदी सात किना-यांवर चालू महिन्याच्या मध्यापर्यंत १५0 जीवरक्षक नेमले जाणार आहेत.
दृष्टी लाइफ सेविंग कंपनी गेली दहा वर्षे गोव्यातील किना-यांवर जीवरक्षक सेवा देत आहे. सुमारे ६00 हून अधिक जीवरक्षक किना-यांवर तैनात आहेत. याशिवाय किना-यांच्या साफसफाईचे कामही याच कंपनीकडे आहे. बृहन्मुंबई महापालिकेनेही आता किना-यांची सुरक्षा आणि जीवरक्षक सेवेसाठी या कंपनीची निवड केली आहे.
गोव्यात २00८ साली या कंपनीने जीवरक्षक सेवा सुरु केली. त्याआधी २00७ साली वर्षभराच्या कालावधीतच २00 जणांचे बुडून मृत्यू झाले होते. त्यामुळे गोवा सरकारने किना-यांवर जीवरक्षक नेमले. गेल्या दहा वर्षाच्या काळात गोव्याच्या किना-यांवर ३ हजारहून अधिक लोकांना बुडताना वाचविल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.
दृष्टी लाइफ सेविंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यानी दिलेल्या माहितीनुसार गोमंतकीय जीवरक्षक उत्कृष्ट सेवा देत आहे त्यांच्याकडून मुंबईच्या कोळी बांधवांना जीव रक्षणाचे प्रशिक्षण मिळाल्यास ती जमेची बाजू ठरेल. भरती, ओहोटी किंवा समुद्राच्या पाण्याचा प्रवाह याचा अंदाज घेऊन पोहण्यासाठी सुरक्षित, असुरक्षित जागा निश्चित केल्या जातात. त्यानुसार बावटे लावून इशारे दिले जातात.
गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे भेट देणा-या देश, विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी सुमारे ८0 लाख पर्यटक येथे भेट देत असतात. यात ६ लाख विदेशी पर्यटक असतात. किना-यांवर सुर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास मनाई आहे. मद्यप्राशन करुन पाण्यात उतरण्यालाही प्रतिबंध आहे. जीवरक्षक या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात आणि प्रसंगी अशा पर्यटकांना सावधही करत असतात.