गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा सपाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:06 PM2019-11-30T16:06:55+5:302019-11-30T16:07:12+5:30
15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा सपाटा सुरू आहे.
पणजी - 15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा सपाटा सुरू आहे. ही मंडळी दुहेरी नागरिकत्व सोडायला तयार नसल्याचे दिसून येते. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्यानंतर युरोपियन महासंघातील राष्ट्रांचे दरवाजे खुले होतात. त्या राष्ट्रांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी बिनदिक्कत जाता येते, त्यामुळे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा कल गोमंतकीयांमध्ये प्रचंड वाढला आहे. सुमारे 55 हजार जणांनी आतापर्यंत पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पोर्तुगीजांनी 450 वर्षे गोव्यावर राज्य केले. पोर्तुगीज जन्म नोंदणी झालेले पालक असतील तर त्यांच्या मुलांना पोर्तुगाल पासपोर्ट मिळवण्याची मुभा आहे. या संधीचा लाभ घेतला जातो. पणजीत आल्तिनो येथे असलेल्या पोर्तुगीज वकिलातीच्या कार्यालयात रोज पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी मोठ्या रांगा असतात.
दुहेरी नागरिकत्वाची अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. याआधी बाणावलीचे माजी आमदार कायतान सिल्वा त्यांच्याविरुद्ध दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर प्रकरण हायकोर्टात गेले होते. सध्या उपसभापती असलेले काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस त्यांच्याविरुद्धही येथील प्रथम श्रेणी न्यायालयात पोर्तुगीज नागरिकत्व प्रकरणी युक्तिवाद सुरू आहेत. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्यानंतर मतदार राहता येत नाही तसेच निवडणुकांमध्येही भाग घेता येत नाही. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या हजारो लोकांची नावे निवडणूक आयोगानेही मतदार यादीतून काढून टाकलेली आहेत.
अधिकृत आकडेवारी सांगते की, केवळ सासष्टी तालुक्यातच दरवर्षी एक हजार ते दीड हजार अर्ज पासपोर्ट प्रक्रियेसाठी येतात. राज्य सरकारच्या अनिवासी भारतीय आयुक्तालयाचे आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर म्हणाले की, दुहेरी नागरिकत्व सोडू इच्छिणार्या लोकांकडून दक्षिण आणि उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज मागविले, परंतु अगदीच अल्प प्रतिसाद मिळाला. युरोपियन राष्ट्रांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळत असल्याने खास करून युवकांमध्ये पोर्तुगीज पासपोर्टविषयी फार आकर्षण आहे. सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती धर्मीय मोठ्या प्रमाणात पोर्तुगीज पासपोर्टचा लाभ घेत आहेत. 1986 साली पोर्तुगाल युरोपियन महासंघाचा सदस्य झाला. त्यानंतर गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. केवळ राजकारणीच नव्हे तर वरिष्ठ पोलीस तसेच प्रशासनातील काही अधिकारीही दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्नावर कचाट्यात सापडले असून स्कॅनरखाली आहेत. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारूनही भारतीय सवलतींचा लाभ ते घेत आहेत.