गोव्याच्या अनुराधा रेडकर यांनी पूर्ण केला बीसीसीआयचा लेव्हन-२ क्रिकेट प्रशिक्षण कोर्स
By समीर नाईक | Published: August 17, 2023 07:18 PM2023-08-17T19:18:35+5:302023-08-17T19:18:44+5:30
मडगाव येथील राहीवासी असलेल्या अनुराधाने २०१८, २०१९, २०२० व २०२१ या क्रिकेट सीझनमध्ये गोवा महिला संघांचे टी-२० व एकदिवशीय स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून काम केले होते
पणजी: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित केलेल्या महिला क्रिकेटमध्ये गोव्याच्या अनुराधा रेडकर हिने बीसीसीआयचा लेव्हन-२ क्रिकेट प्रशिक्षणाचा कोर्स सफलरित्या पूर्ण केला आहे. दि. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान ऑनलाईन व नंतर दि. ९ ते १२ मे २०२३ या कालावधीत ऑनसाईट असेसमेंटद्वारे या परीक्षेचे आयोजन बेेंगळूरु येथे केले होते.
मडगाव येथील राहीवासी असलेल्या अनुराधाने २०१८, २०१९, २०२० व २०२१ या क्रिकेट सीझनमध्ये गोवा महिला संघांचे टी-२० व एकदिवशीय स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्यापूर्वी २०१७ ते २०२० या हंगामात २३ वर्षाखालील महिला संघाचे तसेच १९ व १६ वर्षाखालील गोवा क्रिकेट संघटनेच्या मुलींच्या संघांनाही प्रशिक्षण दिले आहे. तिची २०१८ क्रिकेट हंगामात दक्षिण विभागातील २३ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदीही नियुक्ती झाली होती.
गेल्या २०२२-२३ क्रिकेट हंगामात अनुराधा रेडकरने गोव्याच्या १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण दिले होते. अनुराधा रेडकर या उच्च दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नावलौकीक आहे. रेडकर यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू तयार केले आहेत.