बोंडला अभयारण्याचा चेहरा-मोहरा बदलणार; केंद्राकडून 50 कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 02:10 PM2019-10-15T14:10:59+5:302019-10-15T14:12:48+5:30
गोव्यातील बोंडला अभयारण्याचा चेहरा मोहरा येणाऱ्या काळात बदलणार आहे.
पणजी - गोव्यातील बोंडला अभयारण्याचा चेहरा मोहरा येणाऱ्या काळात बदलणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या 50 कोटी रुपये निधीतून अभयारण्यातील वन्य प्राण्यांचे जुने पिंजरे बदलण्यात येणार असून तेथे नवे पिंजरे येणार आहेत. तसेच काही ठिकाणी विस्तारही केला जाणार आहे. गोव्याचे पर्यटन किनाऱ्यांपुरतेच मर्यादित राहू नये, तर राज्यातील अभयारण्ये तसेच अंतर्गत भागातही पर्यटक पोचावेत, अशी सरकारची इच्छा आहे.
पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, केंद्रीय अभयारण्य प्राधिकरणाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार या अभयारण्यात वन्य प्राणी संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. 50 कोटी रुपये खर्चाच्या कामांना केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. वन खात्याचा ना हरकत दाखला मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कारण ही मालमत्ता वन खात्याच्या अखत्यारित येते.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकांची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. गोव्याचे पर्यटन किनाऱ्यांपुरतेच मर्यादित राहू नये, तर राज्यातील अभयारण्ये तसेच अंतर्गत भागातही पर्यटक पोचावेत, अशी सरकारची इच्छा आहे. महामंडळाच्या ठिकठिकाणी मालमत्ता असून त्यात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणे ताबडतोब हटवण्याची व आवश्यक ती कारवाई करण्याचा महत्त्वाच्या निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच हणजुण येथे येथे जीटीडीसीच्या मालमत्तेतील अलीकडेच पाडण्यात आलेले बांधकाम हा विषय चर्चेत आला असता तेथे आता महामंडळातर्फे रेस्टॉरंट उभे करण्याचा निर्णय झाला.
दोन कंपन्यांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करणारे पर्यटक आता 'लक्ष्य' बनवले जातील. उघड्यावर स्वयंपाक करून कचरा करणार्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. किनाऱ्यांवरील प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या आदी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली जातील. तसेच पार्किंग व्यवस्थाही नीटनेटकी केली जाईल. राज्याचा पर्यटन हंगाम गेल्या 4 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला आहे. रशियाची चार्टर विमाने दाखल झालेली आहेत.