‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमुळे गोव्याला छावणीचे स्वरूप!
By admin | Published: October 12, 2016 05:45 AM2016-10-12T05:45:35+5:302016-10-12T05:45:35+5:30
‘चोगम’नंतर गोव्यात होणारी पाच राष्ट्रांच्या ‘ब्रिक्स शिखर परिषद’साठी मोबोर व केळशी या दोन्ही भागांत कडेकोट सुरक्षा तैनात केली असून परिषदेचे ठिकाण असलेल्या मोबोरच्या
सुशांत कुंकळयेकर / गोवा
‘चोगम’नंतर गोव्यात होणारी पाच राष्ट्रांच्या ‘ब्रिक्स शिखर परिषद’साठी मोबोर व केळशी या दोन्ही भागांत कडेकोट सुरक्षा तैनात केली असून परिषदेचे ठिकाण असलेल्या मोबोरच्या ‘हॉटेल लिला’पासून सहा कि.मी. अंतरावरच्या केळशी किनाऱ्यावर सीमा सुरक्षा दलांच्या टेहळणी तोफा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
किनारपट्टी सुरक्षेला अधिक महत्त्व दिले आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. ‘लोकमत’च्या टीमने मंगळवारी या परिसराची पाहणी केली असता, अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या परिषदेच्या आयोजनाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. केळशी किनाऱ्यावर सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी तैनात केली आहे. समुद्र किनाऱ्यावर देशी-विदेशी पर्यटक आणि त्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर तैनात असलेले सैनिक असे चित्र या किनाऱ्यावर दिसत होते.
लीला हॉटेलमध्ये मुख्य परिषद होणार असून जवळच्या रामाडा आणि अन्य हॉटेलमध्येही ब्रिक्सचे प्रतिनिधी उतरणार आहेत. या परिषदेनिमित्त किमान हजारभर प्रतिनिधी गोव्यात येणार असून या सर्वांच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसेच केंद्रीय राखीव दलाच्या एकूण १0 तुकड्या दाखल झाल्या आहेत.स्थानिकांसाठी ‘पास’ : १४ ते १६ आॅक्टोबर या तीन दिवसात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह हजारो ब्रिक्सचे प्रतिनिधी केळशी-मोबोर भागात येणार असल्यामुळे स्थानिकांच्या हालचालीवर निर्बंध येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र स्थानिकांवर कुठलेही निर्बंध आणले जाणार नाहीत, असे आश्वासन दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी दिले. स्थानिकांच्या हालचालीवर निर्बंध येऊ नयेत, यासाठी त्यांना खास पास दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वास्तविक मुख्य परिषद जरी पाच राष्ट्र प्रमुखांची असली तरी एकूण ११ राष्ट्रांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित रहाणार आहेत. त्याशिवाय जगभरातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या तीन दिवसात गोव्यात ठाण मांडून असणार आहेत.
मंगळवारी दूरदर्शनची भली मोठी टीम मोबोर परिसरात दाखल झाली होती. एक-दोन दिवसांतच या प्रसारणांसाठी दूरदर्शनची यंत्रणा सज्ज होईल, अशी माहिती संबंधितांकडून मिळाली.