गोव्याचा अर्थसंकल्प 6 रोजी मांडणार, ग्रामीण विकासावर भर : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 07:39 PM2020-01-27T19:39:34+5:302020-01-27T19:39:42+5:30
राज्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प येत्या 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे.
पणजी : राज्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प येत्या 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पाचा भर यावेळी ग्रामीण विकासावर असेल आणि पर्यटन क्षेत्रचीही काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
विधिमंडळ कामकाज समितीचीही (बीएसी) सोमवारी बैठक झाली. 3 फेब्रुवारीपासून पाच दिवसीय अधिवेशन सुरू होईल. 6 रोजी अर्थसंकल्प मांडावा असे बीएसी बैठकीत ठरले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पासाठी समाजाच्या सर्व थरातील लोकांनी त्यांच्या सूचना कराव्यात. लोकांनी त्यांच्या कल्पना मांडाव्यात. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. रोजगार निर्मितीवर अर्थसंकल्पाचा भर असेल काय असे पत्रकारांनी विचारले असता, रोजगार निर्मितीवर भर असू शकत नाही, ग्रामीण विकासावर अर्थसंकल्पाचा भर असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्याही लोकांकडून ईमेलद्वारे व अन्य प्रकारे बजेटसाठी सूचना येत आहेत. अनेकांकडून प्रसार माध्यमांमध्येही मते मांडली जात आहेत. गोव्याच्या कृषी, आयटी व अन्य अनेक क्षेत्रंमध्ये बुद्धीमान तरूण आहेत. अनेकांकडे अनुभव आहे. त्यांनी त्यांचे अनुभव वेब पोर्टलवर नोंद करावेत, आम्ही सूचना विचारात घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्वीच्या अर्थसंकल्पातील किती तरतुदींचे पालन केले गेले. किती आश्वासने पाळली गेली. किती योजना अंमलात आणल्या गेल्या याचा आढावा घेणो सुरू आहे. यावेळी विधानसभेत त्याविषयी कृती अहवाल मांडला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
वेब पोर्टल सुरू
दरम्यान, अर्थसंकल्पाविषयी गोवाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन ह्या संकेतस्थळावर गोवा बजेट, असा विभाग आहे. तिथे लोक सूचना नोंदवू शकतील. मुख्यमंत्री सावंत यांनी या वेब पोर्टलचे उद्घाटन केले. एरव्ही एनजीओंकडून काही प्रकल्पांना आक्षेप घेतला जातो. त्यांच्याकडून न्यायालयात धाव घेतली जाते. गोव्याच्या हिताच्यादृष्टीने त्यांनीही वेब पोर्टलवर अर्थसंकल्पासाठी सूचना करावी. आमच्या राजकीय विरोधकांनीही सूचना कराव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले.