मुंबईतील गोवा भवन दोन वर्षापासून बंद ; पर्यायी व्यवस्थाही नाही, गोमंतकीयांची मुंबईत मोठी परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 05:40 PM2017-09-29T17:40:33+5:302017-09-29T17:40:38+5:30
मुंबईच्या जुहू येथील गोवा भवन डागडुजीच्या सबबीखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असल्याने गोव्यातून मुंबईला कामाधंद्यानिमित्त किंवा वैद्यकीय उपचारांसाठी जाणा-या लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.
पणजी : मुंबईच्या जुहू येथील गोवा भवन डागडुजीच्या सबबीखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असल्याने गोव्यातून मुंबईला कामाधंद्यानिमित्त किंवा वैद्यकीय उपचारांसाठी जाणा-या लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. मुंबईतील वास्तव्यात गोमंतकीयांना येथे माफक दरात राहण्याची सोय उपलब्ध होती. आता महागड्या हॉटेलांमध्ये रहावे लागत आहे.
दोन वर्षे बंद ठेवूनही अद्याप या इमारतीचे दुरुस्तीकाम गोवा सरकार हाती घेऊ शकलेले नाही याचे कारण ‘म्हाडा’ बरोबर केलेल्या भाडेकराराची फाइल गहाळ झाल्याचे सांगण्यात येते. गोवा दमण दिव संघप्रदेश असताना हा भाडेकरार झाला होता त्यानंतर गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आणि दमण, दिव वेगळा झाला. गोवा सरकारने ही फाइल दादरा, नगर हवेली प्रशासनाकडेही शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती सापडू शकली नसल्याची माहिती मिळते.
गोव्याच्या गेल्या विधानसभा अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाकडे बोलून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजून पान हललेले नाही.
जुहू येथे गुलमोहर रोड-१२ वर असलेली ही इमारत जुनी झाली असल्याच्या कारणास्तव तेथे स्थित गोवा भवन राज्य सरकारने डागडुजीसाठी म्हणून दोन वर्षांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता १८ आॅगस्ट २0१५ पासून अचानक बंद केले. गोव्याच्या सचिवालयात सर्वसाधारण प्रशासन विभागात या भवनातील खोल्या आरक्षित करुन गोवेकर मुंबईला जात असत. जुहूसारख्या शांत ठिकाणी आणि सांताक्रुझ येथील स्थानिक विमानतळापासून अंतर जवळ असल्याने गोवेकर मंडळी गोवा भवनातच रहात असत. डॉर्मिटरी, खोल्या अशी चांगली व्यवस्था याठिकाणी होती. हे भवन बंद झाल्याने आता मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी जाणाºया रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांचीही परवड झालेली आहे.
इमारतीच्या डागडुजीसाठी म्हाडाचा ना हरकत दाखला तसेच अन्य परवाने हातात नसतानाही नूतनीकरणासाठी ते बंद करुन लोकांची परवड करण्यात आली आहे. दोन वर्षे इंचभरही काम झालेले नसून लोकांना वेठीस धरण्याच्या गोवा सरकारच्या या प्रकाराबद्दल सर्व थरातून संताप व्यक्त केला जात आहे. इमारतीच्या डागडुजीसाठी परवानगी मिळण्याआधीच बुकिंग बंद का केले, असा संतप्त सवाल लोक करीत आहेत. सरकारने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कराराची मूळ प्रत गायब?
ही इमारत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची (म्हाडा) आहे. अशी माहिती मिळते की, गोवा सरकारला ती भाडे तत्त्वावर देताना केलेल्या कराराची मूळ प्रत गायब झालेली आहे. गेले दोन महिने कराराची मूळ प्रत शोधण्यातच वेळ गेला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की, गोवा संघप्रदेश असताना हा भाडेकरार झाला होता. ही प्रत दादरा, नगर हवेलीत असण्याची शक्यता असल्याने तेथेही शोधली जात आहे.
या इमारतीत तुलिप, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आदी चार कार्यालये आहेत. वरचे दोन मजले अन्य आस्थापनांच्या ताब्यात आहेत व ती आस्थापने जागा रिकामी करण्यास तयार नाहीत, अशी माहिती देण्यात आली.
आता खर्चही वाढणार-
गोवा भवन इमारतीच्या डागडुजीवर १ कोटी ४४ लाख रुपये खर्च केला जाणार होता. हा अंदाजित खर्च दोन वर्षांपूर्वी काढलेला होता. परवाने हातात न पडल्याने अजून काम सुरुच व्हायचे आहे त्यामुळे हा खर्च आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम मजबूत करण्यासाठी स्ट्रक्चरल रिपेअर, वॉटरप्रूफिंग तसेच जमिनीच्या फरशा बदलणे रंगरंगोटी आदी कामासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे.