गोव्याच्या किनारपट्टीतील शॅक्स वीज चोरीसाठी स्कॅनरखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 11:48 AM2018-01-09T11:48:01+5:302018-01-09T11:48:46+5:30
गोव्याच्या किनारपट्टी भागांमधील शॅक्सवर (पर्यटन गाळे) गोवा सरकारच्या वीज खात्याने आता विशेष लक्ष ठेवले आहे.
पणजी- गोव्याच्या किनारपट्टी भागांमधील शॅक्सवर (पर्यटन गाळे) गोवा सरकारच्या वीज खात्याने आता विशेष लक्ष ठेवले आहे. किनारी भागांमध्ये वीज चोरीचे प्रकार वाढले असून त्यात काही शॅकदेखील आघाडीवर आहेत, असे वीज खात्याला लक्षात आले आहे. खात्याने कारवाई मोहीम सुरू केली आहे.
गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे शॅक हे एक महत्त्वाचे अंग आहे. केवळ गोव्याच्याच किनाऱ्यांवर शॅक दिसून येतात. लाकूड आणि माडाच्या झावळांचा वापर करून किनाऱ्यांवर सध्या सुमारे पाचशे शॅक उभे करण्यात आले आहेत. वागोतार, बागा, अनजुना, हरमल, मोरजी, मांद्रे, कळंगुट, कांदोळी, सिकेरी, केळशी, माजोर्डा अशा किनाऱ्यांवर शॅक्स जास्त दिसून येतात. या शॅकमधून खास गोमंतकीय पद्धतीचे जेवण व अन्य खाद्य पदार्थ पुरविले जाते. शिवाय मद्याचे नानाविध प्रकार उपलबद्ध असतात. यापूर्वी काही शॅकमधून अंमली पदार्थाची (ड्रग्ज) विक्री होत असल्याचेही आरोप झाले व त्यामुळे सरकारने शॅकना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आदेश दिला होता. काही शॅक्स मालकांनी त्याची अंमलबजावणी केली.
वीज खात्याच्या अधिकाऱ्यांचे पथक अलिकडे वारंवार किनारपट्टीतील शॅक, रेस्टॉरंट्स, छोटी हॉटेल्स आणि अन्य व्यवसायांच्या ठिकाणी भेट देऊन वीज कनेक्शनची पाहणी करू लागली आहेत. शॅकमध्ये रेस्टॉरंट, बार व अन्य व्यवसाय चालतो. तिथे चोरटय़ा पद्धतीने वीज घेतल्यास वीज खात्याला महसुलाला मुकावे लागते. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सांगितले, की काही शॅक घरगुती वापराची वीज बेकायदा पद्धतीने थेट शॅकसाठी जोडून घेतात. नवा मीटर न लावता थेट घरांमधून वीज वाहिनी रेतीखाली लपवून ती शॅकमध्ये आणली जाते. हरमलमध्ये असा प्रकार आढळून आल्यानंतर वीज खात्याच्याही चौघा कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारने कारवाई केली.
मंत्री मडकईकर म्हणाले, की अगदी-एक दोन दिवसांसाठी देखील वीजेचा वापर होत असेल तर, संबंधितांनी तात्पुरता वीज मीटर लावायला हवा. आम्ही मतदारसंघांमध्ये होणाऱ्या स्पर्धावेळी देखील कुणी थेट वीज कनेक्शन मागायला आले तर कायदेशीर पद्धतीने प्रक्रियेचे पालन करून व वीज मीटर लावून घेऊन वीज कनेक्शन घेण्याचा सल्ला देतो. जर बेकायदा पद्धतीने कुणी वीज जोडणी घेतली व एखादा अपघात झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवे. वीज खात्याच्या कनिष्ठ अभियंत्यांनीही ते लक्षात घ्यावे.
दरम्यान, वीज खाते वीजचोरी रोखण्यासाठी आता एक स्वतंत्र विभाग स्थापन करणार असल्याची माहिती मिळाली. किनारपट्टी भागांमध्ये हॉटेल व्यवसायिकांकडूनही होणारी वीज चोरी यापूर्वी खात्याने उघड केली आहे, असे सुत्रांनी सांगितले.