गोव्यातला ड्रग्स व्यवहार सरकारच्याच संमतीने?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 09:13 PM2019-12-28T21:13:35+5:302019-12-28T21:18:50+5:30

गोव्यात एकेकाळी ड्रग्स यायचे व त्याचा फैलाव केवळ हिप्पींपुरता मर्यादित असायचा.

Goa's drug dealing with the consent of the government? | गोव्यातला ड्रग्स व्यवहार सरकारच्याच संमतीने?

गोव्यातला ड्रग्स व्यवहार सरकारच्याच संमतीने?

googlenewsNext

- राजू नायक

गोव्यात होणा-या ‘सनबर्न क्लासिक’ या ईडीएमच्या पहिल्याच दिवशी अती ड्रग्स सेवनाने दोघांचा झालेला मृत्यू हा राज्य सरकारला लाजिरवाणा असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. अशा महोत्सवात अमली पदार्थाचा सुळसुळाट असतो, त्याच लालसेने देशभरातील तरुणाई गोव्यात येते हे तर जगजाहीर आहे. राज्य सरकारलाही त्याची जाणीव असल्याने सरकारने सावध राहावे, ड्रग्स व्यापा-यांवर नजर ठेवावी, सुरक्षा व्यवस्था कडक करावी अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने झाल्या प्रकाराने प्रशासनाची, पोलीस दलाची व गृह खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. काही जणांनी तर सरकारवर थेट आरोप करून उच्चपदस्थांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे.

ज्या भागात ही घटना घडली, तेथील आमदार व माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी मला सांगितले की या किनारपट्टी भागात चालू असलेल्या अमली पदार्थाची इत्थंभूत माहिती देणारी सात पत्रे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत. परंतु मुख्यमंत्री दखल घेत नसल्याने त्यांनी पंतप्रधानांनाही एक पत्र लिहिले. त्याचे आठ दिवसांत त्यांना उत्तर आले. पालयेकर म्हणतात, शिवोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक व उपनिरीक्षक ड्रग्स लॉर्ड्सचेच आश्रित आहेत. या प्रकरणाला जबाबदार धरून पोलीस निरीक्षकाला ताबडतोब निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गोव्यात एकेकाळी ड्रग्स यायचे व त्याचा फैलाव केवळ हिप्पींपुरता मर्यादित असायचा. आता त्यांची वाहतूक स्थानिक लोक करतात. बहुतेक किनारी हॉटेल्स व श्ॉकवाले त्यात सामील आहेत. येथील काही नाईट क्लबमध्ये आता सर्रास रेव्ह पाटर्य़ा आयोजित होऊ लागल्या आहेत. भाजप सरकारच्या आशीर्वादानेच हे प्रकार चालले असल्याची टीका होत आहे. परंतु आरोप होऊनही भाजप ते गंभीरपणे घेत नाही. काही नेत्यांना तर ड्रग्स पैसा वर्षानुवर्षे मिळतो असा आरोप होत होता. दुर्दैवाने विनोद पालयेकर मंत्री असताना त्यांच्या वैयक्तिक मोहिमेमुळे बंद पडलेला ड्रग्स व्यवहार पूर्ववत सुरू झाला आहे.

पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी असले ईडीएम किंवा किनारी जलसे, महोत्सव आवश्यक असतात, यात तथ्य आहे. परंतु त्यांच्यावर नियंत्रण हवे आहे. गोव्यासारख्या ठिकाणी ड्रग्स पूर्वीपासून उपलब्ध होते. काही प्रमाणात ड्रग्सचा व्यवहार हा जगभरात चालतच असतो. मुंबई, नवी दिल्लीत गोव्यापेक्षा कैकपटींनी ड्रग्स व्यवहार चालतो, अशी माहिती उपलब्ध आहे. परंतु आता असे सांगितले जाते की अनेक रासायनिक ड्रग्स गोव्यात यऊ लागले आहेत. अॅसिड, एक्टसी, कोकेन, मारिजुआना सारख्या पदार्थावर देशात बंदी असूनही ते गोव्यात सापडतात. हिमाचल, पुष्कर व गोवा अशा ठिकाणी नेपाळहून ते आणून विक्री केली जाते. नायजेरियनांची एक टोळीच त्यात वावरते.

तरुणांमध्ये आज मारिजुआना व कोकेन ही द्रव्ये खूप लोकप्रिय बनली असून देशभरातील उच्चभ्रू तरुण त्याच आशेने गोव्यात येतात. दुर्दैवाने हे ड्रग्स गुप्तरीत्या विकले जात असल्याने त्यांची विश्वासार्हता तपासता येत नाही. हे बरेचसे ड्रग्स भेसळयुक्त असू शकतात. काहींनी तर त्यांचे मिश्रण गोव्यात करणारे छोटे छोटे कारखानेच चालविले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलीस सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ साली दर आठवडय़ाला पाच या संख्येने ड्रग्स विक्रेत्यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण पाच कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अमली पदार्थाची ५०७ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. सूत्रांच्या मते, राज्यात एकूण १२७ ड्रग्स डिलर आहेत. त्यांच्यापैकी ब-याच जणांची माहिती पोलिसांना आहे.

राज्यात अमली पदार्थविरोधी दलही आहे. कधी तरी ते छापे टाकतात व पदार्थ जप्तही करतात; परंतु मोठय़ा प्रमुख व्यापा-यांपर्यंत त्यांचे हात पोहोचत नाहीत. त्यामुळे राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप सर्रास होतो. राज्यात पकडण्यात आलेले काही विदेशी ड्रग्स लॉर्ड पोलिसांना नंतर गुंगारा देऊन पळून गेले आहेत. पेडणे व कळंगुट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा व्यवहार मोठय़ा प्रमाणात चालतो. दुर्दैवाने पोलिसांचे जाळे भक्कम असले तरी ड्रग्स व्यवहार आणखी जोमाने फोफावतच चालला आहे. गोव्यात कित्येक हजार कोटींचा हा व्यवहार असल्याचा कयास असून गृह खाते त्यात गुंतलेले नाही म्हणणे, धाडसासेच होईल.

वर्ष गुन्हे नोंद
२०१४  : ५४
२०१५ : ६१
२०१६  : ६०
२०१७ : १६८
२०१८  : २२२
२०१९ (सप्टेंबरपर्यंत) : १८९

Web Title: Goa's drug dealing with the consent of the government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा