गोव्याचा दुधसागर धबधबा अखेर खुला; पर्यटकांची लगबग
By किशोर कुबल | Published: October 12, 2023 12:59 PM2023-10-12T12:59:06+5:302023-10-12T12:59:21+5:30
पर्यटकांच्या पसंतीचे स्थान असलेल्या गोव्यातील दुधसागर धबधब्यावर आजपासून पुन्हा लगबग सुरु झाली.
पणजी : पर्यटकांच्या पसंतीचे स्थान असलेल्या गोव्यातील दुधसागर धबधब्यावर आजपासून पुन्हा लगबग सुरु झाली. पावसाळ्यानंतर हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.
जुलैमध्ये मैनापी, नेत्रावळी धबधब्यावर बुडून दोघांवा अंत झाल्यानंतर धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घातली होती. त्यानंतर कमी धोक्याचे काही धबधबे खुले केले. दुधसागर धबधबा खुला झाला नव्हता.
पावसाळ्यात पर्यटकांची गोव्याच्या धबधब्यांवर मोठी गर्दी असते. १६ जुलै रोजी प्रसिध्द दुधसागर धबधब्यावर प्रवेश नाकारलल्याने हजारो पर्यटक अडकले. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीबरोबर संतापाचे वातावरण पसरले होते. वन खात्याने अभयारण्ये तसेच वन क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास बंद घातली होती.
पावसाळ्यात दुधसागर धबधब्यावर विहंगम दृष्य असते. गोव्याहून लोंढ्याकडे जाणारी रेलगाडी या धबधब्याजवळून जाते. लाखो पर्यटक पावसात या धबधब्याला भेट देत असतात. राज्यात हरवळे तसेच अन्य ठिकाणीही धबधबे आहेत. परंतु दुधसागरला पर्यटकांची विशेष पसंती असते.
दरम्यान, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गांवकर यांनी पर्यटकांना धबधब्यावर नेणाय्रा जीपचालकांना शिस्त पाळण्याचे व जबाबदारीने वागण्याचे आवाहन सुरु केले आहे. धबधब्यावर पर्यटकांची काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.