गोव्यातील प्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:08 AM2021-04-30T10:08:52+5:302021-04-30T10:11:29+5:30
कोरोना झाल्यानंतर योगीराज यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
फोंडा/पणजी : गोव्यातील पहिले युवा सतारवादक, रेडिओ कलाकार योगीराज नाईक बोरकर (५३) यांचे गुरुवार, दि. २९ एप्रिल रोजी निधन झाले. राजन मिश्रा यांच्या पाठोपाठ योगीराज यांच्या रूपाने संगीत क्षेत्राला बसलेला हा दुसरा धक्का आहे.
कोरोना झाल्यानंतर योगीराज यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच सामाजिक, सांस्कृतिक व संगीत क्षेत्रातील शेकडो गोमंतकीयांना मोठा धक्का बसला.
तीन वर्षांपूर्वी आकाशवाणीवरून त्यांची मुंबईत बदली झाली होती. शुक्रवारी त्यांचा मृतदेह पर्वरी येथे नेण्यात येईल. यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हार्दोळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
गोव्यातील सतारवादनाच्या क्षेत्रात योगीराज याने स्वतःचे एक नाव केले होते. त्यांची बहीण प्रचला आमोणकर हिला मी गायन शिकवले होते. पण योगीराजचे कार्यक्रम बघायचे तेव्हा एका वेगळ्याच विश्वात जायचे. त्यामुळे जेव्हा सतार आठवेल तेव्हा योगीराज हे नाव डोळ्यासमोर येत राहील.
- डॉ. अलका देव मारुलकर
गोव्याचे अग्रगण्य सतारवादक आणि अंब्रुज महालाचे सुपुत्र योगीराज नाईक यांचे अकाली जाणे धक्कादायक आणि दुःखद आहे. त्याचे संगीत क्षेत्राला खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने गोमंतकाच्या संगीत क्षितिजावरील लखलखणास तारा निखळला. ईश्वर त्यांच्या आत्याला सद्गती देवो व परिजनांना शक्ती देवो.
- नितीन ढवळीकर, शास्त्रीय गायक
योगीराज बोस्कर हे आकाशवाणीवरील कलाकार होते. त्यांच्या जाण्याने आकाशवाणीचे नुकसान तर झालेच, पण एक उच्च दर्जाचा सतारवादक आपण गमावला आहे. त्याच्या जाण्याने गोव्यातील संगीत क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.
- शकुंतला भरणे, आकाशवाणी कलाकार