गोव्याचे मासळीवाहू ट्रक कारवारमध्ये अडविले; स्थानिक मच्छिमारांचा एफडीए अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 09:58 PM2018-12-14T21:58:49+5:302018-12-14T21:58:59+5:30
मासळी आयातीवरील निर्बंधांच्या वादाने शुक्रवारी नवे वळण घेतले. कारवारहून आणलेली मासळी जप्त करुन एफडीए अधिका-यांनी ती नष्ट केल्याने येथील मच्छिमारांनी बांबोळी येथे एफडीए अधिका-यांना घेराव घातला .
पणजी : मासळी आयातीवरील निर्बंधांच्या वादाने शुक्रवारी नवे वळण घेतले. कारवारहून आणलेली मासळी जप्त करुन एफडीए अधिका-यांनी ती नष्ट केल्याने येथील मच्छिमारांनी बांबोळी येथे एफडीए अधिका-यांना घेराव घातला तर दुसरीकडे कारवारच्या मच्छिमारांनी गोव्यातून गेलेले मासळीचे ट्रक तेथे अडविले आणि ट्रकना आग लावण्याची धमकी दिली. यामुळे मासळीचा हा विषय पुन: चिघळला आहे.
मालिम येथील मांडवी फिशरमेन्स को आॅपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य असलेल्या ५0 ते ६0 मच्छिमारांनी काल सकाळी बांबोळी येथील एफडीए कार्यालयावर धडक दिली. गोव्यापासून ६0 किलोमिटर अंतरात असलेल्या आणि तासाभरात गोव्यात पोचणा-या शेजारी राज्यातील मासळीला एफडीएच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार होती त्याचे काय झाले, असा या मच्छिमारांचा सवाल होता. कारवारहून आलेले मासळीचे ट्रक अडविले जात आहेत आणि त्या मच्छिमारांना त्रास दिला जात आहे, अशा तक्रारी असल्याचे निदर्शनास आणले. परंतु याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मच्छिमारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले.
कारवारचे मासळी व्यापारी त्यांची वाहने गोव्यात अडविली जात असल्याने संतप्त बनले आहेत. त्यांनी गोव्याची मासळीवाहू वाहने अडविण्याचे सत्र आरंभले आहे.
दबावाखाली झुकणार नाही : आरोग्यमंत्री
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोणी कितीही घेराव घातले आणि एफडीए कार्यालयासमोर निदर्शने केली तरी जनतेच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. एफडीएचे नियम मासळी व्यापाºयांना पाळावेच लागतील, असा इशारा दिला. ते म्हणाले की, ६0 किलोमिटर अंतरात असलेल्या छोट्या मासळी व्यापा-यांबाबत सहानुभूती आहे परंतु मोठ्या व्यापाºयांनी या सवलतीचा लाभ घेऊ नये याची दक्षता घ्यावी लागले. छोट्या व्यापा-यांसाठी जी मुभा द्यायची आहे त्याबद्दल अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरी बाब म्हणजे गोव्यातून मासळी निर्यात करणा-यांनाही एफडीएचे नियम लागू होतील.