गोव्याच्या उद्योगपतींचे खासगीत मोदीविरोधी, तर इतरांसमोर स्तुतीचे सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:34 PM2019-04-17T12:34:54+5:302019-04-17T12:36:24+5:30
गोव्यातील कोटय़धीश असे जे उद्योगपती आहेत, ते एकत्र येतात तेव्हा नेमके काय बोलतात व व्यक्तीगत पातळीवर बोलायचे झाले तेव्हा नेमका कोणता संवाद साधतात हे कळायचे असेल तर कुणीही एखाद्या बडय़ा उद्योगपतीच्या सोहळ्य़ात सहभागी व्हावे.
पणजी : गोव्यातील कोटय़धीश असे जे उद्योगपती आहेत, ते एकत्र येतात तेव्हा नेमके काय बोलतात व व्यक्तीगत पातळीवर बोलायचे झाले तेव्हा नेमका कोणता संवाद साधतात हे कळायचे असेल तर कुणीही एखाद्या बडय़ा उद्योगपतीच्या सोहळ्य़ात सहभागी व्हावे. मंगळवारी रात्री गोव्यातील अनेक बडे उद्योगपती पणजीतील सोहळ्य़ात एकत्र आले. पणजीतील एका हॉटेलमध्ये एका ज्येष्ठ उद्योजकाचा वाढदिन सोहळा होता व त्यावेळी डिनरचा आस्वाद घेताना काहीजण एकमेकांशी खासगीत काय बोलत होते व एकत्र आल्यानंतर काय बोलत होते याचे वर्णन लोकमतच्या प्रतिनिधीना त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या काही छोटय़ा उद्योजकांकडून ऐकायला मिळाले.
त्या डिनरमध्ये सुमारे दोनशे छोटे- मोठे उद्योजक सहभागी झाले. एकही मंत्री किंवा आमदार नव्हते. एका महत्त्वाच्या राजकारण्याची पत्नी तेवढी होती. अन्य काही प्रतिष्ठीत महिला होत्या. ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 10 कोटी रुपये आहे असे किमान दहा उद्योगपती या पार्टीला उपस्थित राहिले. खनिज खाण व्यवसाय, हॉस्पिटेलिटी, पर्यटन, फार्मास्युटीकल, आयटी, वैद्यकीय अशा उद्योगधंद्याशी ज्यांचा संबंध आहे असेही अनेक उद्योजक डिनरला होते. गोव्यासह देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने साहजिकच प्रत्येकजण जेवताना देशातील राजकीय स्थिती, गोव्यातील स्थिती व गोव्याचे राजकीय भविष्य याविषयी खासगीत चर्चा करत राहिले. रात्र जसजशी पुढे सरकत राहिली, तसतसे ग्लास ग्लासाला भिडू लागले.
सोहळा चांगलाच झाला. जेव्हा दोघे उद्योजक एकमेकांशी बोलायचे तेव्हा त्यांनी वेगळा सूर लावला व जेव्हा पाच-सहा उद्योगपती एकत्र आले तेव्हा त्यांनी वेगळा सूर लावला, असे पार्टीत सहभागी झालेल्या दोघा उद्योजकांनी तरी लोकमतला सांगितले. एकमेकांशी बोलताना उद्योजक गुप्तपणो मनातील गोष्टी बोलू लागले. काहीजणांना अदानी- अंबानींचे वैभव खुपते हेही चर्चेतून कळून आले. केंद्रातील सरकार अदानी- अंबानींच्या हाती गेले, पाच विमानतळ एकाच कंपनीला मिळतात वगैरे चर्चा आपआपसांत झाली. मात्र हेच सगळे उद्योजक जेव्हा डिनरवेळी मग पाच-दहाजणांच्या गटात सहभागी झाले तेव्हा या गटाचा सूर पूर्ण वेगळा झाला. मोदी यांच्यातच खरी धमक आहे, आम्ही मोदींसोबतच आहोत, मोदींमुळेच अर्थव्यवस्था भविष्यात सुधारेल अशा प्रकारच्या गोष्टी उद्योजकांच्या गर्दीमध्ये रंगल्या.
कोणी मोदींना जाऊन सांगितले तर...
अशा प्रकारे दोन सूर लावण्यामागिल कारण काय असावे असे लोकमतच्या प्रतिनिधीने एका उद्योजकाला विचारले तेव्हा इंटरेस्टींग उत्तर मिळाले. भीती. फियर. खासगीत काहीही बोलता येते पण पाच-दहा उद्योजकांमध्ये आम्ही बोलतो तेव्हा मोदींविषयी व भाजप सरकारविषयी सकारात्मक किंवा चांगलेच बोलावे लागते, अन्यथा आम्ही असे बोलत होतो असे मोदींना कुणी तरी सांगेल ही भीती गोमंतकीय उद्योजकांमध्येही आहे असे एक उद्योजक म्हणाले.