गोव्याचा ‘लोकोत्सव’ शुक्रवारपासून, ५५0 लोककलाकारांचे सादरीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 06:55 PM2018-01-08T18:55:24+5:302018-01-08T18:58:19+5:30

भारतीय हस्तकला तसेच विविधांगी लोककलांनी सजलेला एकोणिसावा लोकोत्सव येत्या १२ ते २१ या कालावधीत दहा दिवस येथील कला अकादमीजवळ दर्या संगमावर होणार आ

Goa's Lokotsav to start from Friday | गोव्याचा ‘लोकोत्सव’ शुक्रवारपासून, ५५0 लोककलाकारांचे सादरीकरण 

गोव्याचा ‘लोकोत्सव’ शुक्रवारपासून, ५५0 लोककलाकारांचे सादरीकरण 

Next

पणजी : भारतीय हस्तकला तसेच विविधांगी लोककलांनी सजलेला एकोणिसावा लोकोत्सव येत्या १२ ते २१ या कालावधीत दहा दिवस येथील कला अकादमीजवळ दर्या संगमावर होणार आहे. येत्या शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते उद्घाटन होईल. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन आणि समारोपाला कार्यक्रमस्थळी पारंपरिक रथ मिरवणूक होईल आणि हा लोकोत्सव पूर्णपणे प्लास्टिकमुक्त असणार आहे. 

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर तसेच उपसंचालक अशोक परब यावेळी उपस्थित होते. गोवा राज्य कला व संस्कृती खाते, उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, झारखंडचे कला संस्कृती खाते, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि पणजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन आहे. 

लोककला सादरीकरणासाठी आकर्षक मंच उभारण्यात येत आहे. देशभरातील १६ राज्यांमधील सुमारे ५५0 ते ६00 लोककलाकार सहभागी होतील. हस्तकला कारागिरांचे ६00 ते ७00 स्टॉल्स असतील. परप्रांतीयांसाठी २00 स्टॉल्स दिले जातील. सकाळी ९.३0 ते रात्री ९.३0 पर्यंत स्टॉल्स उघडे असतील. जागा कमी असल्याने यंदा प्रथमच भागिदारी पध्दतीवर स्टॉल्स दिले जाणार आहेत. सुमारे ३ कोटींची आर्थिक तरतूद लोकोत्सवासाठी करण्यात आली आहे. 

हस्तकला प्रदर्शनात वेगवेगळे विणकाम, पारंपरिक तसेच अन्य कपडे, लाकडी सामान, काचेच्या वस्तू, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातील. खवय्यांसाठी गोमंतकीय, गुजराती, राजस्थानी व अन्य राज्यांमधील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील. रोज सायंकाळी ६.३0 ते रात्री ९.३0 या वेळेत गोव्याची विविध लोकनृत्ये तसेच अन्य राज्यांच्या लोककलाही सादर केल्या जातील. सिक्कीमचे सिंघी जाम, राजस्थानचे मांगनीयार, कालबेलिया, भवाई व कठपुतली, मणिपूरचे पुंग ढोल चोलम व थांग टा, आसामचे बिहाग बिहू व बारदोई शिरवला, गुजरातचे केरवानो वेष, मेवासी, सिध्दी धमाल, छत्तीसगढचे पंथी, ओडिशाचे गोटीपुआ व संभलपुरी, पश्चिम बंगालचे पुरुलिया छांऊ, महाराष्ट्राची लावणी व कोळी नृत्य, कर्नाटकचे ढोलू कुनिथा व लंबानी आदी ४0 हून अधिक लोकनृत्यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून देश, विदेशी पर्यटकांना आकर्षित केले जाईल. 

यंदाचा लोकोत्सव प्लास्टिकमुक्त!
मंत्री गावडे यांनी दिलेल्या अधिक  माहितीनुसार लोकोत्सवात सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल होते. यंदा प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी असून कपड्यांच्या पिशव्या वापरण्याचे निर्देश स्टॉलधारकांना दिलेले आहेत. खाद्यपदार्थांची विक्री करणाºयांनीही हा नियम काटेकोरपणे पाळावा लागेल. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था शेजारील बांदोडकर फुटबॉल मैदानाच्या तसेच बांधकाम खात्याच्या जागेत करण्यात आलेली आहे. 

Web Title: Goa's Lokotsav to start from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा