अबब! गोव्यातील बँकांमध्ये अनिवासी भारतीयांचे तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 09:05 PM2018-10-07T21:05:10+5:302018-10-07T21:07:32+5:30
परदेशात स्थिरावलेल्या गोवेकरांची गोव्यातील बँकांत मोठी 'माया'
पणजी : गोव्यातील व्यावसायिक बँकांमध्ये अनिवासी भारतीयांची सुमारे १४,५४७ कोटी रुपये ठेव असल्याची आश्चर्यकारक माहिती बँकेमधील काही विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. ही ठेवीची रक्कम ३० जून २०१८ पर्यंतची आहे. मुळचे गोवेकर असलेले काही अनिवासी भारतीय हे आर्थिकदृष्ट्या चांगले स्थिरावले आहेत. त्यामुळेच ही प्रचंड मोठी ठेव बँकांमध्ये अनिवासी भारतीयांकडून ठेवली गेली आहे.
या रकमेतील उत्तर गोव्यातील बँकांच्या शाखांमध्ये ७, ५४२ कोटी रुपये, तर दक्षिण गोव्यातील बँकांच्या शाखांमध्ये ७,००५ कोटी रुपये एवढी ठेव आहे. युरोपीयन आणि अमेरिका यासारख्या विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या बँकांपेक्षा भारतीय बँका या जास्त व्याज दर देतात. त्यामुळे अनिवासी भारतीय हे भारतातील बँकांमध्ये पैसे ठेवण्यास पसंत करतात. त्याचबरोबर अनिवासी भारतीयांच्या ठेवीवर बँकांकडून खास आक र्षक सवलती देऊ केल्या जातात. यात व्याज आयकर मुक्त आणि ठेवीची संपूर्ण परतफेड दिली जाते. अनिवासी भारतीयांच्या ठेवी या भारताच्या आर्थिक प्रणालीसाठी चांगल्या आहेत. कारण त्या बँकांचा ताळेबंद मजबूत करण्यास मदत करतात. मात्र, या ठेवींवर कर्ज देण्यास गोव्यातील बँकांना एक आव्हान असते.