गोव्याची सत्ता ‘बिंदी’सारखी - अमित शहा
By admin | Published: April 10, 2017 03:47 AM2017-04-10T03:47:46+5:302017-04-10T03:47:46+5:30
एखाद्या कन्येच्या कपाळावर बिंदी लावल्यास ती शोभून दिसते, त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणात शोभा आणण्यासाठी
पणजी : एखाद्या कन्येच्या कपाळावर बिंदी लावल्यास ती शोभून दिसते, त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणात शोभा आणण्यासाठी गोव्याच्या सत्तेची बिंदी मिळवणे भाजपाला गरजेचे होते, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे पक्षाच्या जाहीर सभेत सांगितले.
शहा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा सत्कार करण्यात आला. सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदी उपस्थित होते.
गोव्यात मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे स्थिर सरकार देणार असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपाला सत्ता स्थापन करणे हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. १३ आमदार असलेल्या भाजपाला सरकार बनविणे कठीण होते, तर काँग्रेसला ते सोपे होते. परंतु काँग्रेसवाले कोणत्या खुर्चीवर कुणी बसायचे याचा विचार करीत राहिले आणि त्या वेळेत भाजपाने सरकार स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोव्यात फिशिंग टर्मिनल
गोव्यात सुसज्ज असे फिशिंग टर्मिनल उभारण्यात येणार असून मच्छीमारांसाठी तेथे सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मच्छीमारांना ११ नॉटिकल मैल अंतरापेक्षा पुढे जाऊन मासेमारी करता यावी, यासाठी कर्ज योजनेत अनुदान देऊन ट्रॉलर घेण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.