गोव्याचा राहुल एव्हरेस्ट मोहिमेवर, मे महिन्यात अंतिम मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 08:27 PM2018-03-17T20:27:44+5:302018-03-17T20:27:44+5:30
प्रत्येक गिर्यारोहकाचे एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे स्वप्न असते.
मडगाव : प्रत्येक गिर्यारोहकाचे एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे स्वप्न असते. गोव्यातील राहुल प्रभूदेसाई या 24 वर्षाच्या युवकानेही हेच स्वप्न बाळगले असून उद्या रविवार 18 मार्च रोजी तो या मोहिमेवर निघणार आहे. राहुल हा मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई यांचा मुलगा असून 29 हजार फुट उंचीवर असलेल्या एव्हरेस्टला गवसणी घालण्यास तो यशस्वी ठरला तर असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोमंतकीय गिर्यारोहक ठरणार आहे. यापूर्वी राहुलने 23,800 फुटावर असलेल्या धवलागिरी या शिखराला यशस्वी गवसणी घातलेली असल्यामुळे या एव्हरेस्ट मोहिमेकडेही तो विश्र्वासाने पहात आहे.
इंटरनॅशनल माऊन्टन गायडर्स या अमेरिकन ग्रुपबरोबर राहुल या मोहिमेवर जाणार असून शनिवारी गोव्याचे नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी त्याला निरोप दिला. यावेळी राहुलचे वडील दिलीप प्रभूदेसाई तसेच आई बबिता प्रभूदेसाई या उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, राहुलचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोमंतकीय ठरणार आहे. त्याला या मोहिमेसाठी 70 लाखावर खर्च येणार आहे. गोवा सरकारकडून जास्तीत जास्त मदत त्याला देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते त्यानुसार ही मदत दिली जाईल असे ते म्हणाले. राहुलची ही मोहीम गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
उद्या या मोहिमेवर रवाना होणारा राहुल पहिले दहा दिवस बेस कँपवर सराव करणार आहे. त्यानंतर 17 हजार फुटावरील कँपवर सुमारे महिना, दीड महिना त्याचा सराव चालू रहाणार असून मेच्या पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात एव्हरेस्टची खरी मोहिम सुरु होणार आहे. एव्हरेस्टवरचे वातावरण बेभरवंशाचे असते त्यामुळे आपली अंतिम मोहीम सर्वस्वी त्यावेळच्या हवामानावरच अवलंबुन असेल असे राहुल म्हणाला.
गेली वर्षभर राहुल या मोहिमेची तयारी करत असून यापूर्वी एव्हरेस्ट सर करणारे पुण्यातील प्रसिद्ध गिर्यारोहक किशोर धागुंडे यांच्याकडून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. त्याशिवाय हिवाळ्यात एक महिना लडाखलाही त्याने सराव केला आहे. मागचे वर्षभर गोव्यात या मोहिमेसाठी सराव करताना दरदिवशी सकाळी तीन ते चार तास आपण सराव करत होतो असे राहुलने सांगितले. त्यात 40 ते 45 कि.मी. अंतर धावणो त्याशिवाय 20 किलोचे वजन पाठीवर घेऊन मडगावजवळ असलेल्या चंद्रनाथ पर्वतावर पर्वतारोहण करत होतो असे त्याने सांगितले. आपल्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच एव्हरेस्टचे हे स्वप्न मी बघू शकलो. एव्हरेस्ट सर करुन आल्यास अन्य गिर्यारोहक तयार करण्यावर आपण भर देणार असे तो म्हणाला.