गोव्याच्या फेरीबोटी ‘राम भरोसे’, गेल्या तीन वर्षात भरकटण्याच्या चार मोठ्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:30 PM2017-12-19T19:30:01+5:302017-12-19T20:32:19+5:30
गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत.
पणजी : गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी नद्यांमध्ये फेरीबोटी भरकटण्याचे चार मोठ्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवीतहानी झालेली नसली तरी फेरीबोटींमधील प्रवासी तब्बल दोन तासांहून अधिक काळ अडकून पडण्याचे प्रकार घडले. अगदी अलीकडे २६ आॅक्टोबर २0१७ रोजी राजधानी शहरात पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट रात्री भरकटल्यानंतर गोंधळ उडाला होता. सुमारे २0 वाहने तसेच प्रवाशी अडकून पडले होते. कांपाल येथे फेरीबोट रुतून पडली. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर तब्बल २४ तासांनी या फेरीबोटीची सुटका करण्यात येश मिळाले होते.
राज्यात वेगवेगळ्या १९ जलमार्गांवर फेरीबोटी चालतात. या जलमार्गांवर पूल नसल्याने बेटांवरुन शहरांकडे ये-जा करण्यासाठी फेरीबोटी हेच प्रमुख साधन आहे. पणजी- बेती, चोडण-रायबंदर, दिवाडी-जुने गोवें, दिवाडी-सांपेद्र या जलमार्गांवर फेरीबोटींची मागणी जास्त आहे त्यामुळे प्रवासीही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात.
अशा भरकटल्या फेरीबोटी
जलमार्ग घटनेची तारीख
कामुर्ली-तुयें १0 फेब्रुवारी २0१६
वाशी-आमई ६ आॅक्टोबर २0१७
पणजी-बेती २६ आॅक्टोबर २0१७
रासई-दुर्भाट ८ आॅक्टोबर २0१७
अनेकदा सोसाट्याचा वारा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे फेरीबोटी भरकटण्याचे प्रकार घडतात परंतु काहीवेळा अन्य कारणेही कारणीभूत असतात. आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी यासंबंधीचा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात विचारला होता. प्रत्येक फेरीबोटीची तपासणी करण्यासाठी मशिनिस्ट नेमलेले असतात. फेरीबोटींवरील कर्मचाºयांकडे मोबाइल फोन दिलेले आहेत. नदी परिवहान खात्याचा वाहतूक विभाग २४ तास कार्यरत असतो आणि आणीबाणीच्यावेळी हे कर्मचारी घटनेची कल्पना या विभागाला देतात, असे लेखी उत्तर त्यांना देण्यात आले.
आणीबाणीच्या काळात नदी परिवहन खात्याची सर्व यंत्रणा सज्ज असते असा दावा सरकारतर्फे केला जात असला तरी प्रवाशांचा अनुभव मात्र वाईट आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, जलद कृती दलाचाही अभाव आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाºया पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे.
फेरीबोटी भरकटण्यास खराब हवामान हे एक कारण आहेच. परंतु त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव ही देखिल अन्य कारणे आहेत.