गोव्याचे सौर ऊर्जा धोरण येत्या 15 दिवसात - निलेश काब्राल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 07:37 PM2018-11-14T19:37:27+5:302018-11-14T19:38:45+5:30
महागड्या वीजेला पर्याय म्हणून गोव्यात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येणार असून राज्याचे सौर ऊर्जा धोरण येत्या 15 दिवसात घोषित केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री निलेश काब्राल यांनी दिली.
मडगाव: महागड्या वीजेला पर्याय म्हणून गोव्यात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येणार असून राज्याचे सौर ऊर्जा धोरण येत्या 15 दिवसात घोषित केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री निलेश काब्राल यांनी दिली. नावेली येथे एका नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करताना त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
हे धोरण जवळपास तयार होत आले आहे. या धोरणाखाली लोकांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा पर्याय स्विकारावा यासाठी सौर ऊर्जा पॅनल्स उभारण्यासाठी येणा-या खर्चात सरकार 50 टक्क्यांपर्यंत सवलत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील लोकांनी हा पर्याय स्विकारावा असे यापूर्वीच आपण आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी पॅनल्स उभारण्याचे काम सुरु करावे सहा महिन्यात त्यांना सवलतीच्या रक्कमेची खात्याकडून परत फेड करु असे त्यांनी सांगितले.
या धोरणाखाली वीज खरेदीसाठीचा दर अद्याप ठरला न गेल्याने हे धोरण अडखळून पडले आहे. येत्या 15 दिवसात ते मार्गी लागण्याची शक्यता आहे. या योजनेखाली प्रती युनिट 4 रुपये असा दर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. लोकांनी घरगुती वापरासाठी सौर ऊर्जेचे उत्पादन करावे यासाठी सरकार उत्तेजन देणार आहे. घरगुती वापर करुन जर वीज शिल्लक राहिली तर सरकार ती विकत घेईल असेही त्यांनी सांगितले.