गोव्याचे पर्यटन मंत्री ड्रग्जविरुद्ध आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 01:46 PM2018-07-03T13:46:47+5:302018-07-03T13:47:00+5:30
विविध प्रकारच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे आता राज्यातील अंमली पदार्थ तथा ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध आता आक्रमक झाले आहेत.
पणजी : विविध प्रकारच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे आता राज्यातील अंमली पदार्थ तथा ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध आता आक्रमक झाले आहेत. ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध पोलिसांनी अधिक व्यापक कारवाई करण्याची गरज आहे, असे मत मंत्री आजगावकर यांनी व्यक्त केले.
लोकांनी पुढे यायला हवे व ड्रग्ज व्यवहार कुठे कुणाकडून चालविले जातात, याची माहिती पोलिसांना द्यायला हवी. राज्यातील वाढत्या अंमली पदार्थ व्यवहारांविरुद्ध सर्व आमदारांनी व मंत्र्यांनीही संघटीत व्हावे, असे आवाहन मंत्री आजगावकर यांनी केले. आम्हाला युवा पिढी बरबाद झालेली पाहायचे नाही. पोलिसांकडून मटका जुगाराविरुद्ध कारवाई केली जाते हे चांगले आहे. पण मटक्यापेक्षाही ड्रग्ज व्यवहारांचा विषय हा अधिक मोठा व अधिक गंभीर आहे, असे मंत्री आजगावकर म्हणाले.
मंत्री आजगावकर यांनी गेल्या वर्षीही ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध जोरदार भूमिका घेतली होती. ज्या भागातील ड्रग्ज व्यवहाराच्या अड्ड्यावर पणजीहून पोलिसांना जाऊन छापा टाकावा लागतो, त्या भागातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध कारवाई व्हायला हवी, असा मुद्दा गेल्या वर्षी मंत्री आजगावकर यांनी मांडला होता व तो विषय त्यावेळी खूप गाजला होता. आता मंत्री आजगावकर यांनी नव्याने ड्रग्ज व्यवहारांवरून अप्रत्यक्षरीत्या गृह खात्यावर दबाव आणणे सुरू केले असल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जाते. पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) सध्या ड्रग्ज व्यवहार व राजकारण्यांचे संबंध या प्रकरणी सभागृह समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने चौकशी काम करत आहे. एका माजी गृहमंत्र्याच्या पुत्राला नुकतेच एसआयटीने समन्सही पाठवले होते.
बलात्काराच्या घटनांविरुद्धही मंत्री आजगावकर यांनी संताप व्यक्त केला. बलात्कार करणा-यांना दुबईमध्ये फाशी दिली जाते. तशीच पद्धत असायला हवी, असे मंत्री आजगावकर म्हणाले. बलात्कार करणा-यांना कुणाचीच माफी नसावी. बलात्कार करणा-यांना फाशी द्यावी हे माझे मत आहे. भारतात दुबईसारखी शिक्षा होत नाही. तशी शिक्षा झाली तरच बलात्कार करणा-यांमध्ये भीती निर्माण होईल, असे मंत्री आजगावकर म्हणाले. दरम्यान, राज्यातील वाढत्या ड्रग्ज व्यवहारांची माहिती पोलिसांना असते. पोलिसांनी अधिक माहितीसाठी भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनाही बोलावून त्याबाबतची माहिती प्राप्त करावी, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.