गोव्याच्या मातीला परमेश्वराचा कलाकाररूपी सदैव आशीर्वाद: अलका कुबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 07:58 AM2024-10-18T07:58:28+5:302024-10-18T07:59:13+5:30
'कलारंग'मध्ये सरदेसाई, उसगावकर, वालुशा, भिडेंचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोव्याच्या मातीत मोठमोठे कलाकार जन्माला आले, हा गोव्याच्या मातीला परमेश्वराने दिलेला आशीर्वाद असल्याचे उद्गार सिने अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांनी काढले. कला व संस्कृती संचालनालय रवींद्र भवन, मडगाव आणि कलांगण मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र भवनात आयोजित कलारंग २०२४ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना काढले.
आपल्याला गोव्यात कार्यक्रमानिमित्त येण्यास आवडते. सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर व आपण अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. गोवा सरकारने चांगले कार्यक्रम घडवून आणावेत. गोव्याचे रसिक प्रेक्षक दर्दी आहेत, असे कुबल म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका हेमा सरदेसाई, सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेत्री वालुशा डिसोझा तसेच डॉ. सुचिता भिडे चाफेकर, कलांगणचे अध्यक्ष राजीव शिंक्रे, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर उपस्थित होते.
नारीशक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान : गावडे
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, गोव्यात नावलौकिक मिळविलेले कलाकार जन्माला आले, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. नारीशक्त्तीचा खऱ्या अर्थाने सत्कार कलांगण संस्थेने घडवून आणला. अशा कलाकारांमुळे गोव्याचे नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले. मंत्री, आमदार हे माजी होतात. परंतु कलाकार हा शेवटच्या श्वासापर्यंत कलाकारच असतो, असे ते म्हणाले. कलांगण संस्थेचे असे कार्यक्रम यापुढे दिवसा घडवून आणावेत व त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कार्यक्रम पाहण्याची संधी द्यावी.
शेवटच्या श्वासापर्यंत कला जोपासणार : हेमा सरदेसाई
हेमा सरदेसाई म्हणाल्या, आपण शेवटच्या श्वासापर्यंत गोव्यातील लोकांचा अभिमान उंचावण्यासाठी काम करणार. श्रीश्री रवीशंकर यांचे कार्य खूप मोठे आहे. लोकांना उर्जेची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्षाच्या गीताचे कौतुक
सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी गोव्यात मोठ्या प्रमाणात रवींद्र भवन सारख्या वास्तू उभ्या राहत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. कलाकारांनी स्वतःबरोबरच गोव्याचेही नाव मोठे करायला हवे. तसेच त्यांनी एक कोंकणी गीत गाऊन दाखवले. पावसामुळे प्रेक्षकांची उपस्थिती कमी जाणवली. सर्वांनी आपल्या भाषणात पावसाचा उल्लेख केला. मात्र, वर्षा उसगावकर यांनी मात्र आपल्या नावात वर्षा असल्याने आपण जाते, तिथे पाऊस पडतो, असे त्या गमतीदारपणे म्हणाल्या. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. आभार प्रकटन अॅड. राजीव शिक्रे यांनी केले. मानले.