देव माशाच्या उलटीच्या तस्करीचा गोव्यात पर्दाफाश; केरळातील दोघांच्या मुसक्या आवळल्या, साडेपाच कोटींचा माल जप्त
By सूरज.नाईकपवार | Published: February 16, 2024 08:25 PM2024-02-16T20:25:15+5:302024-02-16T20:25:54+5:30
संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता, अधिक तपासासाठी त्यांना पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मडगाव: देवमासा (व्हेल) च्या उलटीच्या तस्करीचा गोव्यातील कोकण रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश करताना केरळ राज्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या. अरुण राजन (३०) व निबिन वर्गिस (२९) अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडील ५,६९४ ग्राम उलटी जप्त केली असून, त्याची किमंत तब्बल ५ काेटी ६० लाख ९४ हजार इतकी आहे. काल गुरुवारी कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता, अधिक तपासासाठी त्यांना पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवमासा हा दुर्मिळ प्रजात असून, त्याचा कुठलाही अवयवाची विक्री करण्यास कायदयाने मनाई आहे. वनजीवन सरंक्षण कायदा १९७२ नुसार हा गुन्हा आहे. या माशाच्या उलटयाचा वापर औषधे तसेच महागडे परफ्युम बनविण्यासाठी केला जातो. दोघेजण गोव्यातून मडगावातून केरळ येथे रेल्वेतून व्हेलची उलटी घेउन जाणार असल्याची पक्की माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यांनतर याबाबत कोकण रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले होते. पाेलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल तसेच वन खात्याचे अधिकारी रेल्वे स्थानकात पाळत ठेवून होते. गुरुवारी त्यांना संशयित सापडले . त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली.
ही उलटी त्या दोघांनी कुठून आणली होती व त्याची डिलिव्हरी ते कुणाला करणार होते याचा सदया पोलिस तपास करीत आहेत. २०२ साली शेजारच्या महाराष्ट्रातील सावंतवाडी येथेही तीन गोमंतकीयांना अटक केली होती.