जमीन घोटाळा प्रकरणात राजकारण्यांची दुसरी यादी 50 पट मोठी, गोंयचो आवाज संघटनेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 05:00 PM2018-05-05T17:00:29+5:302018-05-05T17:00:29+5:30
14 राजकारण्यांनी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केल्याच्या आरोपावरुन सध्या गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
मडगाव : 2021 च्या प्रादेशिक आराखड्याचा फायदा घेऊन 14 राजकारण्यांनी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केल्याच्या आरोपावरुन सध्या गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच हा आरोप करणाऱ्या ‘गोंयचो आवाज’ या संघटनेने या संदर्भातील दुसरी राजकारण्यांची नवीन यादी लवकरच जाहीर करु असे प्रतिआव्हान दिले आहे. ही यादी पूर्वीच्या यादीपेक्षा 50 पट मोठी असेल असाही दावा करण्यात आला आहे.
या संघटनेचे सहनिमंत्रक कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी शनिवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी ज्या 14 राजकारण्यांवर जमीन रुपांतरांचे आरोप केले गेले आहेत त्या सर्वानी आपल्यावरील आरोप नाकारीत गोंयचो आवाज संघटनेवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या संघटनेने ही घोषणा केली आहे. आपल्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केल्यास त्याला आम्ही सामोरे जाऊ असेही फर्नाडिस यांनी सांगितले.
गोंयचो आवाज या संघटनेने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समिती समोर आरोपकत्र्यानी आपले पुरावे द्यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र या समितीवर आमचा विश्र्वास नसल्याने त्या समितीसमोर आम्ही जाणार नाहीत. हा जमीन घोटाळा खनिज घोटाळ्यापेक्षाही मोठा असून त्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमून न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी गोंयचो आवाज संघटनेने केली आहे.