सोन्याला नवी झळाळी, चांदीही चकाकली; दसऱ्याच्या मुहूर्तामुळे गाठला ७९ हजारांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 11:40 AM2024-10-09T11:40:03+5:302024-10-09T11:40:49+5:30
दसऱ्यानिमित्त अनेकांकडून आतापासून सोने व चांदीच्या नाण्यांचे सराफी दुकानांमध्ये बुकिंग केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा सणावेळी यादिवशी सोने व चांदी खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. परंतु यावर्षी २४ कॅरेट सोन्याचा दर चक्क ७९ हजारांच्या पार तर एक किलो चांदीचा दर ९६ हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता चांदीची नाणी खरेदीस प्राधान्य मिळत आहे.
दसऱ्यानिमित्त अनेकांकडून आतापासून सोने व चांदीच्या नाण्यांचे सराफी दुकानांमध्ये बुकिंग केले जात आहे. शिवाय कमी व हलक्या वजनाच्या डिझायनर दागिन्यांनाही अधिक पसंती मिळत आहे. मध्यंतरी सोने स्वस्त झाले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा महागले आहे. इराण व इस्राईल यांच्यात युद्धसदृष्य स्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीच्या दरात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक सराफी बाजारपेठेवर झाला आहे.
गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर म्हणाले, '२४ कॅरेट सोन्याचा दर ७८ हजारांच्या पार जात तो ७९ हजारांपर्यंत पोहचला आहे. तर १ किलो चांदीचा दरसुद्धा ९६ हजार झाला आहे. दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी २ व ४ ग्रॅम सोन्याच्या नाण्यांप्रमाणेच १० ग्रॅम सोन्याच्या नाण्यांचे आतापासून बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सोने महागल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.
गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
सोन्याप्रमाणेच चांदीत गुंतवणूक फायदेशीर आहे. कारण चांदीचे दरही सतत वाढत आहेत. युद्ध, शेअर मार्केटचा परिणाम सोन्याचे दर ८० हजार तर चांदी १ लाखांपर्यंत जाऊ शकते. या स्थितीत सोने व चांदीकडे गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही पाहिला जात असल्याचे गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर यांनी सांगितले.