सोने ८० हजारांवर तर चांदी लाखमोलाची! दिवाळीत दरात विक्रमी वाढत तरीही ग्राहकांचा ओढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2024 07:50 AM2024-11-03T07:50:20+5:302024-11-03T07:51:36+5:30
ऐन दिवाळी सणात सोन्या-चांदीचे दर वाढले असले तरी ग्राहक मात्र मनसोक्त खरेदी करताना दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोन्या-चांदीचे दर दरदिवशी नवे उच्चांक गाठत आहेत. सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर ८० हजारांच्या पार असून चांदीनेही मोठी भरारी घेत विक्रमी १ लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या एक किलो चांदी १ लाख रुपयांवर पोहोचली आहे. ऐन दिवाळी सणात सोन्या-चांदीचे दर वाढले असले तरी ग्राहक मात्र मनसोक्त खरेदी करताना दिसून आले.
दिवाळीत धनत्रयोदशीला सोने व चांदी खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे यंदा सोने व चांदीची १ ग्रॅम ते ५० ग्रॅमपर्यंतची नाणी खरेदी अधिक झाली. तुळशी विवाहानंतर लग्नसमारंभांना सुरुवात होणार असल्याने त्यादृष्टीनेही अनेकांनी खरेदी केली आहे.
दरम्यान, गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर म्हणाले, यंदा सोने व चांदीच्या दरात यंदा मोठी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटी धरुन तब्बल ८१ हजार ५०० रुपये तर एक किलो चांदी १ लाख रुपये झाली आहे. यात दरात आणखीन वाढ अपेक्षित आहे.
युद्धामुळे दरवाढ
इराण व इस्त्राईल दरम्यान निर्माण झालेल्या युध्दस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे त्याचा येथील बाजारपेठेवर थेट १८ कॅरेट ६,४४४ - १४ कॅरेट ५,१३१ परिणाम जाणवत आहेत. यंदा सोने व चांदीची नाणी खरेदी करण्यावर लोकांनी जास्त भर दिला. याशिवाय वाढीव किंमती लक्षात घेता धनत्रयोदशीनिमित्त दागिन्यांच्या मेकिंग चार्जिसवर बऱ्यापैकी सुट दिली होती, त्यांनी सांगितले.
डायमंडही महागला
सोन्या प्रमाणेच डायमंडचे दागिनेही बरेच आकर्षक असतात. सध्या डायमंडचा दर हा कॅरेटनुसार असून त्याची सुरुवात ७० हजारांपासून पुढे आहे. मात्र महाग असूनही डायमंड ज्वेलरीला मोठी पसंती मिळत आहे. विशेष करुन याकडे गुंतवणूक म्हणून पाहिली जात आहे.